नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत भारताने अखेर स्थान पटकावले आहे. 188 मतांनी विजय होत, भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत आगामी तीन वर्षांसाठी आपलं स्थान निश्चित केले आहे. पुढील वर्षापासून म्हणजे 2019 च्या जानेवारीपासून भारताचा कार्यकाळ सुरु होईल.

विशेष म्हणजे, मानवाधिकार परिषदेच्या निवडणुकीत इतर देशांच्या तुलनेत भारताला सर्वाधिक मतं मिळाली. गुप्त पद्धतीने मतदान करण्यात आले. एकूण 18 सदस्य पूर्ण बहुमताने या निवडणुकीत जिंकले. मानवाधिकार परिषदेत स्थान मिळवण्यासाठी किमान 97 मतांची आवश्यकता असते.


संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांच्या महासभेत भारताकडे पुढील तीन वर्षे परिषदेचं सदस्यपद राहणार आहे.

आशिया प्रशांत श्रेणीसाठी एकूण पाच जागा होत्या. यात भारताबरोबर बहरीन, बांगलादेश, फिजी आणि फिलीपाईन्स यांनी देखील अर्ज केला होता. मात्र, भारताचे इतर देशांशी असलेले संबंध पाहता, भारताचा विजय निश्चित मानला जात होता.

या निवडणुकीनंतर संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे राजदूत अकबरूद्दीन यांनी भारताच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचे आभार मानले.