भारत-चीन सीमावाद | चर्चेतून मार्ग काढण्यावर एकमत, आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2020 09:54 AM (IST)
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे हद्दीत चीनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्याने भारत आणि चीनदरम्यान तणाव वाढला होता.
या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी आपल्यातील मतभेदांना वादामध्ये रुपांतरीत न करता चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला आहे.
नवी दिल्लीः लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे हद्दीत चीनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्याने भारत आणि चीनदरम्यान तनाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी आपल्यातील मतभेदांना वादामध्ये रुपांतरीत न करता चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशांच्या संवेदनशील बाबी, चिंता आणि अपेक्षांचा सन्मान करत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. आज भारत आणि चीनच्या लष्काराचे कोअर कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची याबाबत एक बैठक होणार आहे. ही बैठक चीनच्या मोलडो-चुशूल स्थित बीपीएम हटमध्ये होणार आहे. भारताकडून या बैठकीचं नेतृत्व लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काल भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत दोन्ही देशांचा भावनांचा आदर केला पाहिजे यावर एकमत झाले. परस्पर सामंजस्यातून आणि शांततेने चर्चा करुन तणावावर तोडगा काढला पाहिजे यावरही अधिकाऱ्यांचे एकमत झाले. चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी चर्चा पूर्वग्रह बाजूला सारुन मोकळ्या वातावरणात पार पडणे अपेक्षित आहे अशी भावना दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मतभेद दूर करण्यावर सहमती- भारतीय परराष्ट्र मंत्रालय भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, या तणावासंदर्भात दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत आणि चीनदरम्यान शांतिपूर्ण, स्थिर आणि संतुलित संबंध ठेवणं आवश्यक आहे. जागतिक स्तरावर देखील यामुळं एक सकारात्मक संदेश जाणार आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वांच्या मार्गदर्शनात मतभेदांबाबत शांतीपूर्ण चर्चा करुन दूर करणं गरजेचं आहे. ही चर्चा करताना संवेदनशील बाबी, चिंता आणि अपेक्षांचा सन्मान केला जाईल आणि यामुळं विवाद टाळला जाईल. मतभेदांना वादाचं रुप दिलं जाणार नाही - चीनी परराष्ट्र मंत्रालय चीनी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे की, दोन्ही देश एकमेकांसाठी संकट तयार करणार नाहीत. तसंच मतभेदांना वादाचं रुप दिलं जाणार नाही. या चर्चेदरम्यान कोविड-19 महामारीच्या संकटाबाबत सहयोगाबाबत आपले विचार मांडले. कसा सुरु झाला हा वाद गेल्या महिन्यात चीनने भारताच्या सीमेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे काही सैनिक 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत आले होते. पूर्व लडाखच्या पैंगोंग त्सो क्षेत्रात भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांशी भिडले होते. लडाखमध्ये 6-7 मे च्या दरम्यान चीन आणि भारतीय सैन्यात झटापट देखील झाली होती. यात काही सैनिक जखमी झाले होते. अशीच घटना 9 मे रोजी सिक्किम सेक्टरमधील नाकूलाजवळ जवळपास 150 भारतीय आणि चीनी सैनिक आपापसात भिडले होते. चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला होता. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलाकडून या सध्याच्या परिस्थितीबाबत पर्याय मागवले होते. तिन्ही दलांकडून आपापल्या तयारीबाबतच्या ब्लूप्रिंट देखील पंतप्रधानांना सोपवल्या होत्या. भारताच्या सीमेलगत चीनकडून होणाऱ्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. लडाखमधील गलवा आणि पेंगोंग त्सो परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले होते. भारताचे वरिष्ठ सैन्य अधिकारी सीमारेषेवर बारिक लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.