India Canada Tension: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येचा आरोप कॅनडानं (Canada) भारतावर केला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. याबाबत बोलताना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेके सुलिव्हन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका कॅनडाच्या आरोपांबाबत अत्यंत चिंतेत आहे, आमचं तपासाला पूर्णपणे समर्थन आहे आणि दोषींना न्याय मिळवून देण्याची इच्छा आहे.
अमेरिका कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचे जेक सुलिव्हन यांनी सांगितलं. निज्जर हत्येवरून अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले की, "अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद असल्याचं मी ठामपणे नाकारतो. आम्ही (कॅनडाच्या) आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत, तपास पुढे जावा आणि गुन्हेगारांना जबाबदार धरलं जावं, अशी आमची इच्छा आहे. हा मुद्दा जाहीर झाल्यापासून अमेरिका तपास होण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत अमेरिका ठाम राहील."
भारताबाबत अमेरिकेचं म्हणणं काय?
जेके सुलिव्हन यांनी म्हटलं की, कॅनडामध्ये एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबद्दल कॅनडाच्या दाव्यानंतर अमेरिकेचे काही अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि सरकार या प्रकरणी भारताला कोणतीही 'विशेष सवलत' देत नाही.
आरोपावर भारताची भूमिका?
भारतानं कॅनडाचे आरोप फेटाळून लावले आहेत. भारतानं कॅनडाच्या पंतप्रधानांचे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं होतं. कॅनडा आपल्या देशात खलिस्तानींना आश्रय देत असल्याचा आरोप भारतानं केला आहे. तसेच, हा मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी कॅनडा भारतावर असे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं भारतानं म्हटलं आहे. तसेच, इकडचं-तिकडचं न बोलता, निज्जरच्या हत्येबाबत जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत पुरावे द्या, असं थेट आव्हानंही भारताच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून अमेरिकेनं जी 20 परिषदेतच सांगितलेलं, पण...
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची कॅनडात हत्या झाल्यानंतर कॅनडा सरकारकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले. या घटनेनंतर आता दोन्ही पक्षातील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारताकडून कॅनडा व्हिसावरही बंदी घालण्यात आली आहे. कॅनडाने केलेल्या थेट आरोपानंतर भारतात संतापाची लाट उसळली असतानाच आता अमेरिकसह पाच देशांनी नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. फायन्साशिअल टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह इतर पाश्चिमात्य देशांनी निज्जरचा हत्येचा मुद्दा जी 20 परिषदेत उपस्थित केला होता, असेही या वृत्तात म्हटले आहे. यामुळे आता जी 20 आयोजन करताना भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना मोदी सरकारकडून कानाडोळा करण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :