नवी दिल्ली : चीन सरकारची वृत्तवाहिनी शिन्हुआ न्यूजच्या तीन पत्रकारांना भारताने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. व्हिसा कालावधी वाढवण्यास नकार देत भारत सरकारने तिघांना भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
जुलै महिन्याच्या अखेरीस संबंधित चीनी पत्रकारांचा व्हिसा संपणार आहे. त्यामुळे तिघांनी आपल्या व्हिसाचा कालावधी वाढवण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र पत्रकारांची ही मागणी केंद्राने नाकारली आहे.
शिन्हुआ न्यूजच्या दिल्ली ब्युरोचे प्रमुख वू कियांग आणि मुंबईतील पत्रकार तांग लू आणि मा कियांग या तिघांना हे आदेश देण्यात आले आहेत. 31 जुलैपर्यंत तिन्ही पत्रकारांना देश सोडण्यास सांगितलं आहे.
गेल्या काही काळापासून भारत आणि चीन या देशातील संबंध तणावपूर्वक राहिले आहेत. भारताच्या एनएसजी प्रवेशाला चीनने आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईनंतर हे संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे. व्हिसा वाढवण्याची मागणी नाकारण्याचं ठोस कारण अद्याप स्पष्ट नाही. चीनी दूतावासाने हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयासमोर उचलून धरलं आहे.