काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आत्मघातकी स्फोट झाला असून, यात 61 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 61 जणांचा मृत्यू, तर 207 जण जखमी झाले आहेत.

 

अमाक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, देह मजांगमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी अल्पसंख्यांक शिया समूहाच्या वस्तीत मोठा स्फोट घडवून आणला. देहमजंग स्क्वेअरमध्ये पॉवर लाईनविरोधात शिया समूहाचे लोक आंदोलन करत होते.

 

खामा डॉट कॉम या वेबसाईटवरील वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी या स्फोटाची जबाबदारी नाकारली आहे. तालिबान संघटनेचा प्रवक्ता मुजाहिद जेवुल्लाहने स्पष्ट केलं आहे की, काबुलमधील हल्ल्याशी तालिबानचा काहीही संबंध नाही. लोकांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी हा स्फोट घडवल्याचा आरोप तालिबानने केला आहे.

 

अफगाणिस्तानच्या आरोग विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या स्फोटात एकूण 61 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 207 जण जखमी झाले आहेत.

 

तोलो न्यूजच्या माहितीनुसार, पहिल्या हल्लेखोराने स्फोट घडवला, तर दुसऱ्या हल्लेखाराचा स्फोट घडवण्यचा प्रयत्न अयशस्वी ठरला. तिसऱ्या हल्लेखाराकडून स्फोट घडवण्याच्या आधीच सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले.

 

स्फोटाचे दृश्य पाहिल्यानंतर स्फोटाची तीव्रता लक्षात येईल. तोलो न्यूजच्या माहितीनुसार, घटनास्थळी अजूनही धुराचं साम्राज्य आहे. शेकडो लोक रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडून आहेत. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही मोठे तडे गेले आहेत.

 

दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.