जगाचं लक्ष या दोन्ही भेटींकडे लागलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे.
या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी चीनला औपचारिक दौऱ्यावर गेलेले नाहीत. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
डोकलाम वादानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या बैठकीत उभय देशांमध्ये कोणताही करार होणार नाही. गेल्या वर्षी डोकलाम मुद्दावरुन दोन्ही देशात निर्माण झालेला वाद आणि व्यापार विषयक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पाच ते सहा वेळा भेटणार
दरम्यान, मोदी 2 दिवस चीनमध्ये असतील. वुहान शहरात मोदी आणि जिनपिंग यांच्यात 5 ते 6 वेळा चर्चा होणार आहे.
या भेटीसाठी चीनने मोदींसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरलं आहे, तर भारतानेही चीनच्या संवेदनशीलतेची काळजी घेतली आहे.
कसा असेल कार्यक्रम?
अनौपचारिक शिखर बैठकीसाठी वुहान पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, बैठकीचा कार्यक्रम हुबेई प्रोविंशियल म्युझियममधून सुरु करतील.
भारतीय वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास मोदी म्युझियमला भेट देतील. आज रात्री दोन्ही नेते एकत्र जेवणही करणार आहेत.
संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची भेट
चीनमध्ये जून महिन्यात शांघाय संगठन शिखर संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदी-जिनपिंग बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
संबंधित बातम्या
कोरियन अध्यक्षांची भेट, किम जोंग उन म्हणाला, नवा अध्याय लिहू!