Burj Khalifa: 14 ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन (Independence Day), पण या दिवशी दुबईतील बुर्ज खलिफावर आपला झेंडाच झळकत नाही, या रोषातून पाकिस्तानी नागरिक चांगलेच भडकले होते. सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिक दुबईतील बुर्ज खलिफाजवळ जमले होते आणि त्यांचा झेंडा बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) न दर्शवल्याने निषेध व्यक्त करत होते, जोरदार घोषणा देत होते. पण खरंच बुर्ज खलिफावर स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचा झेंडा दिसला नाही का? जाणून घेऊया...


घटनेमागचं नेमकं सत्य काय?


पाकिस्तानी लोक भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर, जवळपास 14 ऑगस्टचा दिवस संपला असताना बुर्ज खलिफावर स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचा ध्वज प्रदर्शित करण्यात आला. जगातील सर्वात उंच इमारतीने दिवसा अखेरीस पाकिस्तानचा ध्वज प्रदर्शित करुन पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


बुर्ज खलिफाने इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला व्हिडीओ


14 ऑगस्टच्या रात्री उशिरा बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा झेंडा दाखवण्यात आला. "77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पाकिस्तानी लोकांनी शुभेच्छा! पाकिस्तानच्या लोकांना त्यांच्या देशाचा वारसा आणि महान कामगिरीचा अभिमान आहे, एकता आणि समृद्धीचा दिवस म्हणून ते स्वातंत्र्य दिन साजरा करतात. आम्हाला आशा आहे की, भविष्यात पाकिस्तानला अधिक यश आणि आनंद मिळेल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!" असं म्हणत बुर्ज खलिफाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने व्हिडिओसह एका पोस्टमधून पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या आहेत.


दुबईचे शासक शेख मोहम्मद यांनीही दिल्या शुभेच्छा


दरम्यान, यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "स्वातंत्र्याची 77 वर्षं साजरी करत असलेल्या पाकिस्तानचं अभिनंदन,"  असं त्यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.






पाक नागरिक बुर्ज खलिफाबाहेर देत होते घोषणा


जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाजवळ शेकडो लोक जमले होते, कारण विविध देशांचे राष्ट्रध्वज त्यांच्या स्वातंत्र्यदिनी आणि इतर विशेष प्रसंगी आणि सणांच्या दिवशी बुर्ज खलिफावर झळकवले जातात. त्यामुळे पाकिस्तानी लोकांनी बुर्ज खलिफावर आपलाही झेंडा दिसेल, अशा अपेक्षा होत्या. परंतु, घड्याळात 12 वाजले असताना इमारतीवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित झाला नाही आणि लोकांच्या भावना भडकल्या.


काही क्षणांनंतर बुर्ज खलिफाबाहेर जमलेला जमाव पाकिस्तानच्या घोषणा देऊ लागला. एका महिलेने तिच्या मोबाईलवर संपूर्ण घटना रेकॉर्ड केली, ज्यात ती हेही म्हणते की "आता रात्रीचे 12 वाजून 1 मिनिट झाला आहे आणि दुबईच्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे की, बुर्ज खलिफावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जाणार नाही आणि त्यामुळे ही आता आमची स्थिती बनली आहे. नागरिकांच्या भावना भडकल्या आहेत"


मागील वर्षी वेळेवर झळकवला होता झेंडा


बुर्ज खलिफाने गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानचा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला होता. दुबईमध्ये पाकिस्तान आणि भारतातून मोठ्या प्रमाणावर परदेशी लोकसंख्या आहे. बुर्ज खलिफाने यावर्षी प्रजासत्ताक दिनी भारताचा तिरंगा प्रदर्शित केला होता आणि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त असंच करणं अपेक्षित आहे.


हेही वाचा:


Tomato Price Drop: स्वातंत्र्य दिनाचं गिफ्ट! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोनं विकण्याची सरकारची घोषणा