मुंबई : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) एकाच वेळी स्वतंत्र झाले. ज्याप्रकारे भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करतो, त्याचप्रकारे पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी हा खास दिवस साजरा करतो. भारतात 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक गाव, शहर स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असतं. सगळीकडे तिरंगे पाहायला मिळतात, तिरंग्याची रोषणाई पाहायला मिळते. देशभक्तीपर गीते ऐकायला मिळतात. प्रत्येक घरापासून लाल किल्ल्यापर्यंत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जात. पण या खास दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये काय होतं आणि पाकिस्तान कशाप्रकारे त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो हे तुम्हाला माहित आहे का?
आज म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. ज्याप्रकारे 15 ऑगस्टला भारताचे पतंप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात तसं पाकिस्तानमध्ये अधिकृतरित्या काय काय केलं जातं. यासोबत सार्वजनिकरित्या स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला जातो हे जाणून घेऊया
पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिन कसा साजरा होतो?
पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यदिनाला Independence Day तसंच यौम-ए-आझादी (Yaum E Azadi) म्हणूनही ओळखलं जाते. या दिवशी पाकिस्तानी नागरिक एकमेकांना 'यौम-ए-आझादी मुबारक' म्हणत शुभेच्छा देतात. दुसरीकडे, जर आपण अधिकृत सरकारी कार्यक्रमांबद्दल बोलायचं झाल्यास याचे सर्व कार्यक्रम पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये (Islamabad) आयोजित केले जातात. या दिवशी संसद आणि राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज (National Flag) फडकवला जातो. यासोबतच राजधानीत 31 तोफांची सलामी दिली जाते.
या दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती लाईव्ह टेलिकास्टद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करतात. यासोबतच राजकीय व्यक्ती रॅली काढतात, भाषणे देतात आणि भारताप्रमाणे शाळा, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करुन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारताप्रमाणेच राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय इत्यादी सजवले जातात.
यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष का?
पाकिस्तानी न्यूज वेबसाईटनुसार, राष्ट्रपती आरिफ अल्वी (President Arif Alvi) राष्ट्रपती भवनातील एका समारंभात राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यासोबतच पंतप्रधान कार्यालयात दरवर्षी होणारा पारंपारिक ध्वजारोहण सोहळा यंदा आयोजित केला जाणार नाही. कारण काळजीवाहू पंतप्रधान आज शपथ घेणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये यंदाचा स्वातंत्र्यदिन विशेष मानला जात आहे.
हेही वाचा