Matthew Mott on Ben Stokes : बे क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच विश्वचषक भारतात होत आहे. एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होतोय. गतवेळचा विश्वचषक 2019 ला झाला होता. इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरले होते. आता 5 ऑक्टोबरपासून 2023 चा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सर्वच संघ तयारी करत आहेत. गतविजेतेही तयारीत व्यस्त आहे. इंग्लंड संघाचे व्यवस्थापन स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सला वर्ल्ड कपसाठी परत आणण्यात गुंतले आहे. बेन स्टोक्स विश्वचषकात खेळणार का? अशी चर्चा त्यामुळे रंगली आहे. इंग्लंडचे कोच मॅथ्यू मॉट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट म्हणाले की, बेन स्टोक्स विश्वचषकात इंग्लंडच्या संघाचा भाग असावा अशी आमची इच्छा आहे, मात्र तो काय निर्णय घेतो हे पाहावे लागेल. आतापर्यंत बेन स्टोक्सने याबाबत कोणताही निर्णय कळवला नाही. तो काय करणार हे अद्याप समजलेले नाही. स्टोक्स विश्वचषकात खेळणार की नाही, हे त्याने आतापर्यंत आपल्या बाजूने स्पष्ट केलेले नाही. मात्र तो विश्वचषक संघाचा भाग नक्कीच असेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर बेन स्टोक्स विश्वचषक संघाचा भाग असेल तर विशेषतः त्याची गोलंदाजी आमच्यासाठी जमेची बाजू ठरेल.


2019 च्या विश्वचषकात केली होती कमाल - 


2019 चा एकदिवसीय विश्वचषकावर इंग्लंडने नाव कोरले होते. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात बेन स्टोक्सचा मोलाचा वाटा होता. स्टोक्सने 66.43 च्या सरासरीने 465 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही सात विकेट्स घेतल्या. 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत स्टोक्स चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत प्रभावी ठरू शकतो. इंग्लंड व्यवस्थापनालाही याची चांगलीच कल्पना आहे आणि त्यामुळेच व्यवस्थापन स्टोक्सच्या पुनरागमनात गुंतले आहे. मात्र, अंतिम निर्णय स्टोक्सचं घेणार आहे. 


इंग्लंडसाठी का महत्वाचा आहे स्टोक्स ?


इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट म्हणतात की, बेन स्टोक्स फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट आहे, पण गोलंदाजीतही तो सक्षम आहे. त्यामुळे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने इंग्लंडकडून खेळावे अशी आमची इच्छा आहे. संपूर्ण अॅशेस मालिकेत आम्ही बेन स्टोक्सला पाहत राहिलो, त्याने उत्तम कामगिरी केली. मागील अनेक वर्षे तो सातत्याने हे काम करत आहेत. बेन स्टोक्ससारखे खेळाडू वनडे फॉरमॅटमध्ये एक्स फॅक्टरसारखे ठरतात. त्यामुळे आमच्यासाठी बेन स्टोक्स महत्वाचा आहे. 


विश्वचषक कधीपासून - 


भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.