Imran Khan : पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना अल कादिर ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा जाहीर केली. इम्रान खाना यांना 14 वर्षांची तर बुशराला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांना 9 मे रोजी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले झाले. खान यांच्या पक्ष पीटीआयने या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
अल-कादिर ट्रस्ट प्रकरण 50 अब्ज रुपयांचा घोटाळा
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात 4 महत्त्वाची पात्रे आहेत. इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी, अब्जाधीश लँड माफिया मलिक रियाझ आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी. इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मलिक रियाझ यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले, असा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. रियाझची ब्रिटनमध्ये कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. लंडनमध्ये त्याच्या एका गुंडालाही अटक करण्यात आली होती, ज्यातून 40 अब्ज पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले होते.
अल कादिर नावाचा ट्रस्ट आहे तरी काय?
या प्रकरणानंतर दोन सौदे झाल्याचा आरोप आहे. या अंतर्गत ब्रिटिश सरकारने रियाझच्या गुंडाकडून जप्त केलेले पैसे पाकिस्तान सरकारला परत केले. इम्रानने या पैशाची माहिती मंत्रिमंडळाला दिली नसल्याचा आरोप पीडीएमने केला आहे. उलट त्यांनी अल कादिर नावाचा ट्रस्ट स्थापन करून धार्मिक शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ सुरू केले. त्याच्या संचालक मंडळात 3 सदस्य होते. इम्रान खान, बुशरा बीबी आणि फराह गोगी. यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन मलिक रियाझने दिल्याचे या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. तसेच बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्याबदल्यात रियाझची सर्व प्रकरणे वगळण्यात आली.
इम्रान खान यांच्या अटकेच्या दोन तासांनंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले की, पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. सरकारी तिजोरीचे किमान 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले. असे असूनही 13 महिन्यांत एकदाही इम्रान किंवा बुशरा चौकशीसाठी आले नाहीत. तीन वर्षांत या विद्यापीठात केवळ 32 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, संपूर्ण प्रकरण पाहता, इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीवर 1,955 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप नोंदवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या