इस्लामाबाद : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाच, बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामधील मतदान केंद्राबाहेर भीषण बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. स्फोटामधील मृतांमध्ये तीन पोलिस आणि दोन मुलांचाही समावेश आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एनए-260 मधील मतदान केंद्राबाहेर हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, "हल्लेखोराने पोलिसांच्या गाडीवर निशाणा साधला होता. परंतु बॉम्ब मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांच्या इथे पडला."

पोलिस आणि बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरुन बॉम्बशोध पथकाने जिवंत ग्रेनेडही जप्त केलं आहे. हल्लेखोराला मतदान केंद्राच्या आत घुसायचं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.


पंतप्रधानपदासाठी आज मतदान
पाकिस्तानमध्ये आज पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 70 वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा लोकशाही पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनचे शहबाज शरीफ, पीटीआयचे प्रमुख इम्रान खान आणि पीपीपीचे बिलावल भुट्टो यांच्यात प्रमुख लढत आहे.

देशभरात 3.71 लाख सैनिक आणि 16 लाख पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 85 हजार मतदान केंद्रांवर 10.59 कोटी अधिकृत मतदार आपला हक्क बजावतील असा अंदाज आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरु राहिल.