इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. मात्र या अफवांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं खान यांनी स्पष्ट केलं आहे.

 
'माझ्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जेव्हा मी लग्न करणार असेन तेव्हा मी घोषणा करेन आणि लग्नसोहळा साजरा करेन.' असं स्पष्टीकरण इम्रान खान यांनी दिलं आहे.

 
इम्रान खान तिसऱ्यांदा लग्न करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खान यांनी आपण तिसऱ्या लग्नाबाबत विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरच या चर्चांना उधाण आलं.

 
ब्रिटीश पत्रकार आणि कार्यकर्त्या जेमिमा गोल्डस्मिथ इम्रान खान यांच्या पहिल्या पत्नी होत्या. 2004 मध्ये दोघं विवाहबद्ध झाले, मात्र 9 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी काडीमोड घेतला. गोल्डस्मिथ सध्या दोन मुलांसह यूकेमध्ये राहतात.

 
जानेवारी 2015 मध्ये इम्रान खान लंडनच्या बीबीसी पत्रकार रेहम खानशी विवाहबद्ध झाले. मात्र 10 महिन्यांतच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि ते विभक्त झाले.