इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले आहे. परंतु जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने मात्र भारताच्या हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरचा धाकटा भाऊ अम्मार याने एका ऑडिओ क्लिपद्वारे या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सोशल मीडियावर अम्मार याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये अम्मार याने भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोटमधील तळ उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे. तसेच, 'मर्काज' (धार्मिक शिक्षणाचे केंद्र किंवा मदरसा) वर बॉम्ब फेकल्याचे सांगितले आहे. याबाबत त्याने नाराजी व्यक्त करत शत्रूंनी युद्ध पुकारले आहे, असे म्हटले आहे.

मसूदचा भाऊ अम्मार याने 28 फेब्रुवारी रोजी पेशावरमध्ये एका जनसभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना तो म्हणाला की, भारतीय विमानांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. त्यांनी आमच्या एका केंद्रांवर हल्ला चढवला होता.

व्हिडीओ पाहा



दरम्यान, भारतीय वायुसेनेने जैशच्या प्रक्षिक्षण केंद्रावर हल्ला केला असून एसआरआरच्या मदतीने टिपलेली छायाचित्रे भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार भारतीय वायुसेनेने जैशच्या चार इमारती पूर्णपणे उध्वस्त केल्या आहेत.

व्हिडीओ पाहा



भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याला पाकिस्तानी लष्कराने दुजोरा दिला आहे. परंतु त्यामध्ये नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केलेले नाही. तसेच बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे कोणतेही तळ असल्याचे त्यांनी मान्य केलेले नाही. या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने किंवा पाकिस्तानी सरकारने मान्य केलेले नाही.