मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने आपण अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. सेनेगल सरकारकडे केलेल्या अपीलामुळे पुजारीच्या प्रत्यार्पणात दिरंगाई होऊ शकते. काही दिवसांपूर्वी आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये रवी पुजारीला अटक करण्यात आली होती.
आपण बुर्किना फासोचे (पश्चिम आफ्रिकन देश) रहिवासी असल्याचा दावा पुजारीच्या वतीने सेनेगल कोर्टासमोर करण्यात आला आहे. पुजारीच्या वकिलाने तसा पासपोर्ट सादर केला आहे. रवी पुजारीने आपली ओळख लपवल्याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या कारवाईला उशीर होऊ शकतो.
रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक केल्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणा रवी पुजारीवर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवून होती.
परराष्ट्र मंत्रालय सेनेगलमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहे. रवी पुजारी गँगच्या गुन्ह्यांची माहिती, इंटरपोलने बजावलेल्या 13 रेड कॉर्नर नोटिसा, मुंबई आणि कर्नाटक पोलिसांनी प्रत्यापर्णासंदर्भात पाठवलेली पत्रं आणि पुजारीच्या खोट्या पासपोर्टविषयी माहिती देणारी कागदपत्रं सेनेगल सरकारसमोर सादर केली आहेत.
पुजारीच्या कुटुंबीयांचे डीएनए नमुने तातडीने गोळा करुन प्राधान्याने सेनेगल सरकारला पाठवण्याचे आदेश मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या त्याच्या बहिणी जयलक्ष्मी सलियन आणि नयना पुजारी यांच्या डीएनए टेस्ट होण्याची शक्यता आहे. पुरावे जमा करण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यार्पण लांबण्याची भीती आहे. भारतीय यंत्रणा मात्र पुजारी तडिपार व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे.
तडिपारीच्या प्रक्रियेमध्ये एखादा देश अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकाला देशातून बाहेर हाकलून देतो, तर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेमध्ये संबंधित देशातील सरकार दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेते.
कोण आहे रवी पुजारी ?
रवी पुजारी हा 90च्या दशकात मुंबईत सक्रिय होता. तो कुख्यात डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. मात्र 2001 साली तो छोटा राजनच्या गँगमधून बाहेर पडला. मुंबईतील गँग्ज विरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर त्यांने मुंबईतून पलायन केलं होतं. त्याच्यावर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याने नुकतंच जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्यावर बॉलिवूड सेलिब्रेटींकडून खंडणी मागिल्याचाही आरोप आहे. तो मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये असल्याची माहिती होती.
माय नेम इज अँथनी फर्नांडिस, गँगस्टर रवी पुजारीचा सेनेगल सरकारसमोर दावा, प्रत्यार्पण लांबणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2019 12:27 PM (IST)
आपण बुर्किना फासोचे (पश्चिम आफ्रिकन देश) रहिवासी असल्याचा दावा पुजारीच्या वतीने सेनेगल कोर्टासमोर करण्यात आला आहे. पुजारीच्या वकिलाने तसा पासपोर्ट सादर केला आहे. रवी पुजारीने आपली ओळख लपवल्याने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या कारवाईला उशीर होऊ शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -