Donald Trump Hush Money: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी चर्चेत आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू आहे. गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. पण अशातच आता याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 


पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प यांनी गप्प बसवण्यासाठी पैसे दिल्याबद्दल खटल्याचा सामना केला आहे, तिने आता ट्रम्पचा बचाव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप आहे. याबद्दल बोलताना स्टॉर्मी डॅनियल्स (Stormy Daniels) प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप त्यांना जेलमध्ये टाकावं असे नाहीत. दरम्यान, माजी राष्ट्रपतींवरील अन्य प्रकरणांतील आरोप गंभीर असतील आणि तपासाअंती ते योग्य आढळले तर त्यांना तुरुंगात पाठवावं, असंही डॅनियल्सनं म्हटलं आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत स्टॉर्मी डॅनियल्स नवा करार?


स्टॉर्मी डॅनियल्सनं अचानक घुमजाव केल्यामुळे आता तिच्यात आणि ट्रम्प यांच्यात नवा करार झालाय का? स्टॉर्मी डॅनियल्स ट्रम्प यांच्यावरील आरोप मागे घेणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहेत. 


अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) एका पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात हजर होण्यापूर्वी मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप लावण्यात आले आहेत. न्यायालयानं त्यांना 1.22 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels) दिले जाणार आहेत.


ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले


भारतीय वेळेनुसार, मंगळवारी रात्री 12.45 च्या सुमारास ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरींनी केलेले आरोप सीलबंद लिफाफ्यात त्यांच्याकडे सुपूर्द केले. ट्रम्प यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला 1,22,000 डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे. तसेच, ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितले की, ते निर्दोष आहेत आणि 34 प्रकरणांमध्ये त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी Not Guilty म्हणत न्यायालयात निर्दोष असल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचं सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले.