कराची: पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका आत्मघातकी हल्लेखोरांनं दर्ग्यात स्वत: ला उडवून दिल्यानं 100 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालायात दाखल करण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं, रुग्णालय परिसरात पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आत्मघातकी हल्लेखोराने दर्ग्याच्या गोल्डन गेटजवळ स्वत:ला उडवून दिलं. या हल्ल्यावेळी दर्ग्यात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यानं हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, लाल शहबाज कलंदर दर्ग्यानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या दर्ग्याला दोन दरवाजे असून, यातील एका दरवाजावर मेटल डिटेक्टर असून तेही नादुरुस्त आवस्थेत आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.