न्यूयॉर्क : लहानपणी डॉक्टर, इंजिनिअरपासून पायलट, एअर हॉस्टेसपर्यंत अनेक करिअर करण्याची स्वप्नं आपण पाहिलेली असतात. जसजसं वय वाढतं, तशी ही स्वप्न बदलत जातात. तंत्रज्ञानात रस असणाऱ्यांना टेक इंडस्ट्रीतील बलाढ्य 'गुगल' कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र एका सात वर्षांच्या चिमुरडीने गुगलमध्ये काम करण्याची इच्छा फक्त स्वतःपाशी ठेवली नाही, तर थेट गुगलाधीशांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.
क्लो ब्रिजवॉटर या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या सात वर्षांच्या चिमुरडीने गुगलला पत्र लिहून आपली गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गुगलच्या प्रमुखांचं नाव माहित नसल्याने किंवा कोणाला उद्देशून पत्र लिहावं, हे ठाऊक नसल्याने तिने 'डिअर गुगल बॉस' अशी गोड हाक पत्राच्या सुरुवातीला मारली आहे.
सात वर्षांच्या क्लोला कॉम्प्युटर, रोबो, किंडल यांची प्रचंड आवड आहे. गुगलच्या ऑफिसमधले फोटो अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ते पाहूनच क्लोने आपल्याला बीन बॅग्ज, स्लाईड्स आणि गोकार्ट्स या गोष्टीही आपल्याला आवडत असल्याचं पत्रात लिहिलं आहे.
कौतुकाची गोष्ट म्हणजे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या पत्राची दखल घेत त्याला उत्तरही धाडलं आहे. तुझं शालेय शिक्षण पूर्ण झालं की तुझ्या नोकरीच्या अर्जाचा नक्की विचार करेन, असा सकारात्मक रिप्लाय त्यांनी केला आहे. क्लोच्या वडिलांनी सुंदर पिचाईंनी दिलेला प्रतिसाद 'लिंक्डइन'वर शेअर केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'तुला कॉम्प्युटर आणि रोबो आवडतात, याचा आनंद वाटला. जर तू अशीच मेहनत घेतलीस, आणि स्वप्नांचा मागोवा घेत राहिलीस, तर तू डोळ्यांसमोर ठेवलेली सगळी उद्दिष्ट पूर्ण होतील, याची मला खात्री आहे. गुगलमध्ये नोकरी करण्यापासून ऑलिम्पिकमध्ये स्वीमिंग करण्यापर्यंत तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझा नोकरीचा अर्ज पाहण्यासाठी मी उत्सुक असेन. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना शुभेच्छा' असं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे.