ह्युस्टन : अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच पाकिस्तानला इशारा दिला. कलम 370 रद्द केल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता मोदींनी त्यांना टोला लगावला. दहशतवादाविरोधातल्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयामुळे ते लोक (इम्रान खान) अस्वस्थ आहेत. ज्या लोकांना आपला देश सांभाळता येत नाही त्यांना अशांती हवी आहे, अशी टीका मोदींनी नाव न घेता पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर केली. या लोकांना अशांती हवी आहे, हे लोकं दहशतवाद पोसत आहेत. तसेच दहशतवादाचं समर्थन करत आहेत. त्यांना तुम्ही चांगलच ओळखता. अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला असो किंवा मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला असो, या हल्ल्यांचे मास्टरमाईंड कुठे सापडतात? असा सवाल मोदींनी विचारला.




दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढाई लढण्याची वेळ आता आली आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित जवळपास 50 हजार लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प दहशतवादविरोधात उभे आहेत. दहशतवादाविरोधातील या लढाईत अमेरिका आणि इस्राईल मोठ्या ताकदीने उभे आहेत, असं मोदींनी सांगितलं.




कलम 370 ला फेअरवेल दिलं


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्याचा उल्लेखही केला. भारतातून कलम 370 ला फेअरवेल दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले. भारतासमोर 70 वर्षांपासून एक मोठं आव्हान होतं, ज्याला काही दिवसांपूर्वी फेअरवेल देण्यात आलं. आम्ही कलम 370 देशातून हद्दपार केलं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना ते हक्क दिले, ज्यापासून ते गेली 70 वर्ष वंचित होते. आमच्या सरकारने गेल्या 70 वर्षांपासून चालत आलेलं कलम 370 रद्द केलं. त्यामुळे संविधानातील जे अधिकार इतर भारतीयांना मिळत होते तेच अधिकार आता जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे एक प्रकारचा भेदभाव नष्ट झाला आहे, असं मोदी म्हणाले.


 VIDEO | #HowdyModi | 'हाऊडी मोदी' संदर्भातील महत्त्वाच्या पाच गोष्टी