टेक्सास : 'हाऊडी मोदी' म्हणजेच कसे आहात मोदी? ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सगळं छान चाललंय' असं उत्तर देऊन अमेरिकन भारतीयांसह लाखो भारतीयांची मनं जिंकली. यावेळी पंतप्रधान मोदींनी 'अब की बार, ट्रम्प सरकार' चा नारा देखील लगावला.  तसेच भारताचा खरा मित्र हा व्हाईट हाऊसमध्ये आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. ह्युस्टनमध्ये  आयोजित 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात ते बोलत होते.


अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने  आयोजित ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर हजारो नागरिकांनी  अभूतपूर्व स्वागत केले. मोदींनी देखील सर्वप्रथम उपस्थित सर्व नागरिकांना हात जोडून अभिवादन केले. यानंतर त्यांनी अमेरिकन सिनेटर्सची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी त्यांनी दहशतवादावर बोलताना त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ज्या लोकांना आपला देश सांभाळता येत नाही ते भारतामध्ये नाक खुपसत आहेत.  हे लोकं दहशतवादाला खतपाणी घालतात. या लोकांची सगळ्या जगाला चांगली ओळख आहे. दहशतवादाच्या विरुद्ध आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे, असा इशारा देखील मोदी यांनी पाकिस्तानला यावेळी दिला.  ट्रम्प देखील संपूर्ण ताकतीनिशी दहशतवादाविरोधात उभे आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी यावेळी म्हणाले की, 21 व्या शतकात भारत नवी उंची गाठणार आहे. न्यू इंडिया हा भारताचा नवा नारा आहे. विविधतेमध्ये एकता ही आमची विशेषतः आहे. मी १३० कोटी लोकांच्या आदेशावर काम करतो असे मोदी म्हणाले. यावेळी देश बदलत असला तरी काही लोकांचे विचार बदलत नसल्याची टीका देखील त्यांनी विरोधकांवर टीका केली.

मोदी यावेळी म्हणाले की, सर्वात स्वस्त डेटा हा भारतात मिळतो, स्वस्त डेटा उपलब्ध केल्याने 'डिजिटल इंडिया' ला प्रोत्साहन मिळत आहे. यावेळी मोदींनी देशातील विकासकामांचा पाढा अमेरिकेतील नागरिकांसमोर वाचून दाखवला.

सुरुवातीला मोदी म्हणाले की, अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा शब्द न शब्द फॉलो करतात. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे वजन आहे. ट्रम्प यांनी नेहमीच आपलेपणा दाखला असल्याचे मोदींनी सांगितले. मोदी म्हणाले की, आज दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांच्या मैत्रीचा दिवस आहे. आज इतिहास घडत असताना संपूर्ण जग साक्षीदार आहे. मला 2017 मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घडवली होती, मी आज त्यांना माझ्या कुटुंबाची भेट घडवत असल्याचे म्हणत मोदींनी उपस्थित भारतीय नागरिकांकडे हात दाखवत म्हटले.

अमेरिकेला महान बनवणं. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करणं हेच ट्रम्प यांचं ध्येय असून अमेरिकेने जगाला खूप काही दिलं आहे, असंही मोदी म्हणाले. ह्यूस्टनपासून हैदराबादपर्यंत, बोस्टनपासून बंगळुरू, शिकागोपासून शिमला आणि लॉस एंजिल्सपासून लुधियानापर्यंत भारत आणि अमेरिकेचे संबंध आहेत, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं.

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

- देशातील देशातील अनेक संशयास्पद कंपन्या बंद केल्या

- देशाच्या विकासासाठी भारतीय अधीर आहेत

- काही दिवसांपूर्वी भारताने ३७० कलम रद्द केलं

- इन्फास्ट्रक्चर, गुंतवणुकीमध्ये सुधारणा

- दोन दिवसात ट्रम्प यांची भेट घेणार

- भारतापासून दूर असलात तरी तुम्ही आमचेच आहात

भारतासाठी नरेंद्र मोदींचे कार्य अतुलनीय : डोनाल्ड ट्रम्प

भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे.  भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

भारत आणि अमेरिकेने नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढवले आहे. दोन्ही देशांमध्ये जवळपास 33 टक्के बेरोजगारी कमी झाली आहे, असे ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेसाठी सीमा सुरक्षा अतिशय महत्वाचा विषय आहे. मुस्लिम कट्टरपंथीयांसोबत एकत्रिपणे लढा देऊ असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला.

ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासीक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छाही दिल्या. ट्रम्प म्हणाले की, मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे नशीब समजतो. भारत-अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात, असेही ते म्हणाले.