लंडन : जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या खात्म्याचं रहस्य अमेरिकी नौदल SEALचा माजी सैनिक रॉबर्ट ओ नीलनं उलगडलं आहे. या घटनेवरील 'द ऑपरेटर्स' या त्याच्या पुस्तकात नीलनं याचं सविस्तर वर्णन केलं आहे. या पुस्तकातील काही भाग 'द डेली मिरर'ने प्रकाशित केला असून, यात ओसामाच्या खात्म्याचं वर्णन करण्यात आलं आहे.
नील सांगतो की, ''ओसामाच्या खात्म्यासाठी SEALचे सहा गट करण्यात आले होते. यातील एका गटात नीलचाही समावेश होता.'' ओसामाच्या खात्म्याच्या घटनेचं रोमांचकारी वर्णन त्यानं यात केलं आहे. तसेच ओसामाचा मृत्यू आपल्याच गोळीनं झाल्याचा दावाही नीलनं या पुस्तकातून केला आहे.
नील म्हणतो की, ''ओसामाचा शोध घेण्यासाठी त्याच्या एबोटाबादमधील घरात शिरलो, आणि मी डाव्या बाजूच्या एका खोलीत डोकावलं. त्यावेळी ओसामा खोलीतील बिछान्यावर बसला होता. मी त्यावेळी पाहिलं तेव्हा तो माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच उंच होता. तसेच त्याची दाढीही लहान आणि केस पांढरे झाले होते.''
नील पुढे लिहतो की, ओसामाने स्वसंरक्षणासाठी एका महिलेचा आधार घेतला होता. त्यामुळे त्याला मारणे थोडं अवघड झालं होतं. पण काळ न दवडता, मी त्या महिलेच्या बाजूला सारलं, आणि ओसामावर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर ओसामाच्या डोक्याची दोन शकलं झाली, आणि तो जमीनीवर पडला. त्याच्या खात्म्याची खात्री करुन घेण्यासाठी मी पुन्हा एक गोळी त्याच्या डोक्यात झाडली.''
ओसामाच्या खात्म्यानंतर मनावरचा ताण कमी झाल्याचंही नीलनं सांगितलं आहे. तो पुढे म्हणतो की, ''ओसामाच्या खात्म्यानंतर मनावरील ताण कमी झाला होता. पुढं काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी माझा दुसरा नौदल SEAL मधला सहकारी पुढे आला. अन् त्यानं मला सांगितलं की तू कामगिरी फत्ते केलीस. ओसामाला तू मारलंस.''
या घटनेदरम्यानच्या तणावाबद्दलही नीलनं सविस्तर वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे. नील म्हणतो की, ''घरात शिरण्यापूर्वीच सर्वजणच तणावा खाली होते. त्याच्या घरात शिरताना आमचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं. त्यातच अंधारामुळे घरात शिरण्यास टीमला अपयश येत होतं. पण तरीही आम्ही कामगिरी फत्ते केली''
अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेननं अमेरिकेतील ट्वीन टॉवर्सवर हल्ला केल्यापासून अमेरिकन सुरक्षा दलाच्या रडारवर आला होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं होतं. पण तरीही तो हाती लागत नव्हता. अखेर त्याला मे 2011 मध्ये अमेरिकेच्या स्पेशल SEAL जवानांनी कंठस्नान घातलं.