जिनेवा : भविष्यात हॅकर्स केवळ तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर नाही, तर तुमचा मेंदूही हॅक करतील, अशी शक्यता एका संशोधनातून समोर येत आहे. माईंड रिडिंग या तंत्रज्ञानामुळे हॅकर्सना तुमचा मेंदू हॅक करणं सोप होणार आहे. न्युरो टेक्नॉलॉजी विकसित होत चालल्यानं ब्रेन हॅक करता येणार आहे. त्यामुळेच आता सायबर लॉ सारखेच मेंदूच्या सुरक्षिततेसाठीही कायदे बनवण्याची गरज असल्याची चिंता काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. न्युरो टेक्नॉलॉजीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय याचा अभ्यास करता येतो, ज्याचा उपयोग ग्राहकांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हे संशोधन समोर आल्यानंतर स्वित्झर्लंडमधील पीएचडीचे विद्यार्थी मार्सेलो लेंसा यांनी न्युरो टेक्नॉलॉजीमुळे मेंदूचं विचार स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणलं आहे.  तसेच यापासून बचावासाठी मेंदूच्या सुरक्षेचे कायदे करण्याची गरज असल्याचं मतही, त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे हेच तंत्रज्ञान माणसाच्या वैयक्तीक आयुष्यात डोकावत असेल, तर त्यावर आळा घालण्याची गरज भविष्यात नक्कीच भासणार आहे.