Corona Omicron Updates : एकीकडे कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे नेतेमंडळी किंवा बडे लोक मोठमोठे कार्यक्रम करताना आणि कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असलेल्या या कार्यक्रमांना उपस्थित राहून सेल्फी घेण्यातही हे बडे लोक मागे हटत नाहीत. शिवाय यावेळी कोरोनाच्या नियमांचं देखील सर्रास उल्लंघन होताना दिसून येतंय. अशात हॉंगकॉंगमधील एका घटनेचं मात्र कौतुक होत आहे. लोकांवर बंधनं घातली जात असताना काही मोठे अधिकारी एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले म्हणून मोठमोठ्या अधिकाऱ्यांना सरळ क्वारंटाईनमध्ये पाठवलं आहे. या घटनेची चर्चा जगभरात होत असून सरकारच्या या निर्णयाचं कौतुक देखील होत आहे. 
 
हाँगकाँगच्या सरकारने गुरुवारी आपल्या गृह सचिवासह 10 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल फटकारले. याबाबत बोलताना हाँगकाँगमधील मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम यांनी म्हटलंय की, या घटनेनं मी अत्यंत नाराज आहे. काही अधिकारी सोमवारी रात्री एका पार्टीत सहभागी झाले होते. ज्यांच्यापैकी काहींची  COVID-19 चाचणी पॉझिटीव्ह आली.

  


आपल्याकडे राज्यात आणि देशात कोरोनाचे आकडे महाभयंकर पद्धतीनं समोर येत असताना देखील राजकीय मंडळी त्यांचे कार्यक्रम घेत आहेत. मोठ्या रॅली, लग्नाच्या कार्यक्रमांना नियमांचं उल्लंघन करत लोकांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती दिसून आली आहे. अशात हॉंगकॉंग सरकारचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद वाटतो. 


तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोविडची काही प्रकरणं आढळून आल्यानंतर हाँगकाँगमधील  हॉटेल्स, बार आणि जिम बंद केल्या आहेत.  हाँगकाँगमध्ये गुरुवारी 38 नवीन कोरोनाबाधित आढळले. सध्या तिथं 348 सक्रिय रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचं सांगितलं जात आहे. अशात वाढदिवसाच्या पार्टीला अधिकाऱ्यांची उपस्थिती ही खेदाची बाब आहे, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


ही वाढदिवसाची पार्टी सोमवारी झाली. या कार्यक्रमातील 10 अधिकाऱ्यांमध्ये गृह मंत्रालयाचे सचिव कॅस्पर त्सुई देखील होते. कॅप्सर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना सरकारच्या केंद्रीय सुविधेत अलग ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर सर्व अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. तसेच हे अधिकारी बसत असलेली सर्व कार्यालयं आणि राहात असलेली निवासस्थानांचं निर्जंतुकीकरण करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. 







मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह