Heat Wave In Mecca: नवी दिल्ली : सौदी अरेबियातील (Saudi Arabia) मक्केमध्ये (Mecca) सध्या हज यात्रा (Hajj Yatra) सुरू आहे. सौदीमधील तीव्र उष्णतेमुळे 550 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये इजिप्तचे 323 तर जॉर्डनच्या 60 भाविकांचा समावेश आहे.


इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांमधल्या नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. तर हजारोंच्या संख्य़ेनं भाविक आजारी पडतायेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मक्केच्या ग्रँड मशिदीत सोमवारी 51.8 अंश सेल्सियस इतकं तापमान होतं. गेल्या वर्षी देखील मक्केमध्ये 240 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यंदा मृतांचा आकडा 550 वर गेला आहे.


समोर आलेल्या आकड्यांनुसार, आतापर्यंत हज यात्रेसाठी गेलेल्या एकूण लोकांपैकी सर्वाधिक मृत्यू इजिप्त येथील भाविकांचे झाले आहेत. आतापर्यंत 323 इजिप्तशियन नागरिकांचा मक्केमधील हीट वेवमुळे मृत्यू झाला आहे. सर्व इजिप्शियन लोकांच्या मृत्यूचे कारण अतिउष्णता असल्याचं सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, गर्दीमुळे झालेल्या जखमांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच, मृत लोकांपैकी 60 जॉर्डनचे रहिवासी आहेत. तर आतापर्यंत 90 भारतीय नागरिक दगावले आहेत. 


हज यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण 577 भाविकांचा मृत्यू 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतांची संख्या 577 वर पोहोचली आहे. यातील 570 मृतदेह मक्काच्या सर्वात मोठ्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. यावर्षी हज यात्रेची सुरुवात 14 जूनला झाली असून 19 जून रोजी यात्रा संपली. दरम्यान, हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या मृत्यूची प्रकरणं पहिल्यांदाच समोर आलेली नाहीत. यापूर्वीही हज यात्रेला गेलेल्या अनेक भारतीय भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. हज यात्रेला गेलेल्या 90 भारतीयांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, तर गतवर्षी आतापर्यंत मृतांची संख्या 101 वर पोहोचली आहे.


हज म्हणजे, इस्लाम धर्माच्या 5 मुख्य स्तंभांपैकी एक. हज ही मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र यात्रा मानली जाते. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीनं आयुष्यात एकदातरी हज यात्रा करणं अनिवार्य मानलं जातं. वातावरणातील बदलामुळे हज यात्रेवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सौदी अरेबियाच्या संशोधनात असं म्हटलं आहे की, हज क्षेत्राचं तापमान दर दशकात 0.4 अंश सेल्सिअसनं वाढत आहे. सौदीच्या हवामान खात्यानं सांगितलं की, 17 जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीजवळचं तापमान 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं.