मुंबई : प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात पोहचलेल्या मुंबईकर तरुणाची अखेर सुटका करण्यात आली आहे. हमीद अन्सारी उद्या भारतात परतणार आहे. हमीदचे आई-वडील गेल्या सहा वर्षांपासून डोळ्यात तेल घालून लेकाची वाट पाहात आहेत. पंजाबमधील वाघा बॉर्डरमार्गे हमीद मायभूमीत परतेल.
नोकरीच्या शोधात असलेला 33 वर्षीय हमीद अन्सारी 4 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईहून अफगाणिस्तानला रवाना झाला. अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात पोहचलेल्या हमीदचा तब्बल तीन वर्षांनंतर (2015) शोध लागला होता. डिसेंबर 2015 मध्ये हमीदवर बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानातील मिलिट्री कोर्टाने त्याला तीन वर्षांचा कारावास सुनावला होता.
काय आहे प्रकरण?
हमीद हा मुंबईतील फौजिया आणि निहाल अन्सारी या उच्चशिक्षित दाम्पत्याचा मुलगा. फौजिया या प्राध्यापिका आहेत, तर निहाल अन्सारी एका बँकेत अधिकारी म्हणून काम करतात. फौजिया आणि निहाल यांनी हमीदलाही उच्चशिक्षण दिलं. हमीदने आयटी इंजिनिअरिंग, एमबीए यासारख्या पदव्या मिळवल्या आहेत.
नोकरीच्या शोधात असलेला हमीद 4 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईहून अफगाणिस्तानला रवाना झाला. मुलाखतीसाठी तो काबूल विमानतळावर पोहचला होता. काही दिवसातच मुंबईत परत येत आहोत, असं त्याने कुटुंबीयांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र त्याचा ठावठिकाणा लागतच नव्हता.
पाकिस्तानी मुलीशी फेसबुक चॅट
हमीदच्या शोधार्थ आई फौजिया यांनी एअरलाईन्सपासून अफगाणिस्तान दूतावासापर्यंत सर्वत्र शोधाशोध केली. त्यादरम्यानच फौजिया यांनी हमीदचं फेसबुक चॅट आणि ई-मेल तपासले. त्यावेळी हमीद पाकिस्तानातील एका मुलीच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं.
हमीद पाकिस्तानातील सबा नावाच्या मुलीशी चॅटिंग करत होता. त्यातून त्यांचं सूत जुळलं होतं. त्यावेळी सबाच्या कुटुंबीयांना या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली असावी. त्यामुळे सबाला त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात येत होतं. त्यामुळे सबाला भेटण्यासाठी हमीद पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होता.
हमीद स्वत: रोटरी क्लब आणि संयुक्त राष्ट्राच्या समाजकार्याशी संलग्न होता. त्यामुळे सबाला मदत करण्याचा त्याचा विचार होता. पाकिस्तानात येण्यासाठी हमीदला काबूलमध्ये काही पाकिस्तानी नागरिकांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार हमीद पाकिस्तानात पोहचला.
पाकिस्तानात अटक
पाकिस्तानात त्याला अता उर रहमान नावाच्या एका व्यक्तीने आपल्या घरात दोन दिवस आसरा दिल्याचं, हमीदच्या आईला त्याच्या फेसबुक आणि ईमेलवरुन समजलं. मग तिथून रहमानने हमीदला एका हॉटेलवर सोडलं. या हॉटेलमधून पाकिस्तान पोलिसांनी हमीदला ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार जीनत यांच्याकडून मिळाल्याचं फौजिया यांनी सांगितलं होतं.
अफगाणिस्तानातून अवैधरित्या पाकिस्तानात घुसल्याचा आरोप हमीदवर होता. हमीदच्या आई-वडिलांनी भारताच्या सर्व मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. कोर्टाची पायरीही ओलांडली, मात्र हमीदचा पत्ता लागत नव्हता.
बऱ्याच महिन्यांनंतर हमीद पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं फौजियांना समजलं. मात्र त्याला का अटक केली, तो कुठे आहे, याबाबतची माहिती समजत नव्हती. मात्र फौजिया यांची आर्त हाक अखेर पाकिस्तानपर्यंत पोहचली आणि त्याचा पत्ता सापडला.
प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2018 10:10 PM (IST)
डिसेंबर 2015 मध्ये हमीदवर बनावट पाकिस्तानी ओळखपत्र बाळगल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानातील मिलिट्री कोर्टाने त्याला तीन वर्षांचा कारावास सुनावला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -