Haiti Earthquake Update : हैती या कॅरेबियन देशात 7.2 रिश्टर क्षमतेच्या शक्तीशाली भूकंपानं होत्याचं नव्हतं केलं. या भूकंपामुळे देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तसेच देशात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपात आतापर्यंत 1300 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. शहरंच्या शहरं उद्ध्वस्थ झाली आहेत. अनेकजण अद्यापही इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
हैतीच्या नागरिक सुरक्षा संस्थेनं जारी केलेल्या माहितीनुसार, हैतीमध्ये आलेल्या 7.2 तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपामुंळं मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपामुळं 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. हैतीच्या नागरी संरक्षण सेवेनं एका ट्वीटमध्ये माहिती दिली आहे की, हैतीतील सूदमध्ये 1,054, निप्समध्ये 122, ग्रँड एन्सेमध्ये 119 आणि नॉर्ड-ऑएस्टमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरं उद्ध्वस्थ, जागोजागी इमारती, घरांचा खच
भूकंपानंतरही हैतीमध्ये काही सौम्य भूकंपाचे झटके जाणवत होते. भूकंपामुळं इमारती, घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अनेकजण बेघर झाले आहेत. काही नागरिकांनी रस्त्यावरच रात्र काढली. रुग्णालयांत तर जागा शिल्लक नाही. भूकंपामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हैतीच्या पंतप्रधानांनी देशात एका महिन्याची आणीबाणी घोषित केली आहे. तसेच नुकसानीचे आकलन होईपर्यंत आंतरराष्ट्रीय मदत घेणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.
पुढील आठवड्यात संकट आणखी वाढू शकतं
भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून 125 किलोमीटरवर असल्याचं अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेक्षणाकडून सांगण्यात आलं आहे. भुकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर काही सौम्य धक्केही जाणवले. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली नागरिकांनी रात्र रस्त्यावरच काढली.
दुसरीकडे पुढच्या आठवड्यात हैतीवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रेस वादळ सोमवार किंवा मंगळवारी हैतीच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युएसएड प्रशासक समांथा पॉवर यांची हैतीच्या मदतीसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. युएसएड हैतीमधील नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार आहे. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली या देशांनीही मदतीची घोषणा केली आहे.
दरम्यान, कोरोना संकट, राष्ट्रपतींची हत्या, अफाट गरीबी आणि भूकंप या लागोपाठच्या संकटांमुळे हैतीमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो नागरिक बेघर झाले आहेत. हैतीच्या सरकारने संपूर्ण देशात एक महिन्यासाठी आरोग्यसेवेचा आपात्काळ जाहीर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :