इस्लामाबाद : मी लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईदचा कट्टर समर्थक आहे. तसंच मीही त्यांचा लाडका आहे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी केलं आहे.


जम्मू काश्मिरमध्ये भारतीय लष्कराविरोधात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचं मुशर्रफ यांनी समर्थन केलं आहे. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा काश्मिरातील कारवायांमध्ये सहभाग असल्याचं सांगत मुशर्रफांनी त्याचं समर्थन केलं. मुशर्रफांनी नुकतीच 23 राजकीय पक्षांच्या महायुतीची घोषणा केली होती.

'लष्कर ए तोयबा ही सर्वात मोठी संघटना आहे. अमेरिकेसोबत भागिदारी केल्यानंतर भारताने त्यांना दहशतवादी घोषित केलं. हो, त्यांचा काश्मिरात सहभाग आहे. पण काश्मिर हा आम्ही आणि भारतातला मुद्दा आहे' असं परवेज मुशर्रफ यांनी 'एआरवाय न्यूज'ला सांगितलं.

लष्कर ए तोयबा आणि जमात-उद-दावा यांचाही मी लाडका आहे, असं मुशर्रफ म्हणाले. पाकिस्तानात लष्कर ए तोयबाला बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुशर्रफ सरकारनेच ही बंदी लागू केली होती.