पेइचिंग : जगातील दुसऱ्या क्रमाकांच्या लांबीच्या रेल्वे मार्गावरील मालगाडीचा प्रवास अखेर काल पूर्ण झाला. चीनला थेट ब्रिटनशी जोडणाऱ्या 12 हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरून, ही मालगाडी काल चीनच्या यिवु शहरात येऊन पोहोचली.


या मालगाडीतून विस्की आणि लहान मुलांसाठीचं दूध, औषधं, तसंच काही यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यात आली आहे. ही मालगाडी 10 एप्रिलला लंडनहून निघाली, त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, रशिया, कझाकिस्तानमधून प्रवास करुन 20 दिवसांनी चीनच्या यिवु शहरात पोहोचली.

ही गाडी चिनी प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी ९.३० वाजता (जीएमटी ०१.३०) यिवुला पोहोचल्याचं यिवु तिआनमेंग इंडस्ट्री कंपनीने सांगितले.

पश्चिम युरोपसोबत व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी सध्या चीनचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी चीनला थेट ब्रिटनशी जोडण्यात आलेला हा मार्ग हे एक महत्वाचं पाऊल समजलं जातं आहे.

हा नवा रेल्वे मार्ग रशियातील प्रसिद्ध ट्रान्स- सायबेरियन रेल्वेपेक्षा लांब असला, तरी 2014 साली सुरु झालेल्या आणि सध्या विक्रमी असलेल्या चीन-माद्रिद मार्गापेक्षा सुमारे एक हजार किलोमीटरने कमी आहे.