अंकारा (तुर्की) : तुर्कीमध्ये रशियाचे राजदूत आंद्रे कार्लो यांची एका आर्ट गॅलरीतील फोटो प्रदर्शनाच्या कार्यक्रम प्रसंगी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राजधानी अंकारामध्ये फोटो प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भाषण करत असताना सुटाबुटात आलेल्या हल्लेखाराने सर्वांसमोर कार्लो यांच्यावर बेछूटपणे गोळीबार केला.



कार्लो यांची हत्या करणारा पोलिस अधिकारी

कार्लो यांची हत्या करणाऱ्याचं नाव मेवलुत मेर्त एडिन्टास असे आहे. आर्ट गॅलरीतील कार्यक्रमात येताना त्याने पोलिसाचं ओळखपत्र दाखवलं होतं. मेवलुत मेर्त एडिन्टास हा अंकारामधील दंगलविरोधी पोलिस पथकाचा सदस्यही होता.



हल्लेखोर ठार, तुर्की मीडियाची माहिती

कार्लो यांना गोळ्या घातल्यानंतर हल्लेखोराने त्याच ठिकाणी उभा राहून घोषणाबाजी केली. तुर्की मीडियाच्या वृत्तांनुसार, मेवलुत मेर्त एडिन्टास या हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे.

हत्येचं कारण काय?

सीरियाच्या बाबतीतील रशियाची भूमिका पाहता तुर्कीमध्ये अनेक दिवसांपासून विरोध प्रदर्शनं चालू होतं. या पार्श्वभूमीवर हल्ल्याचं गांभिर्य अधिकच वाढलं आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर रशियाने तातडीची बैठक बोलावली आहे.



जगभरातून हत्येचा निषेध

तुर्कीचे राष्ट्रपती रेचॅप तैयप अर्दोआन यांनी रशियन राजदूताच्या हत्येचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय, रशिया आणि तुर्की यांच्यामधील संबंध बिघडवण्याच्या हेतून हा हल्ला केल्याचा त्यांनी म्हटलं आहे. यावेळी तुर्कीचे राष्ट्रपती अर्दोआन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत फोनवरुन या घटनेसंदर्भात चर्चा केली.



तुर्की आणि रशियाचे राष्ट्रपती काय म्हणाले?

“रशिया आणि तुर्की या दोन देशांमधील संबंध बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हा हेतू आम्ही यशस्वी होऊ देणार नाही”, असे तुर्कीचे राष्ट्रपती अर्दोआन म्हणाले. तर, “तुर्की आणि रशियामधील संबंध सुधरत असल्याने आणि सीरियामधील शांतता प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी असा हल्ला केला गेला आहे.”, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन म्हणाले.