मंबई : 14 हजार कोटींच्या गैरव्यवहारातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला फसवणाऱ्या महिलेच्या ओळखीबद्दलची गूढ कायम असताना, अँटिग्वा आणि बार्बुडा सरकारने मेहुल चोक्सीला भारतात परत पाठवण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला आहे. "माझं प्रशासन चोक्सीला डोमिनिकाहून थेट भारतात परत पाठवण्याच्या विनंतीवर ठाम आहे. चौकशीला सामोरं जाण्याऐवजी त्याने कोर्टाता वापर आपलं नागरिकत्व रद्दबातल करण्यासाठी केला, असं अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी एका इंग्लिश वृत्तपत्राला सांगितलं.


"चोक्सीने आपला वकील बदलला आहे. विरोधी पक्ष युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टीतील जस्टिन सिमॉन त्याचे वकील असतील. पक्षाच्या प्रचारासाठी यूपीपीने मेहुल चोक्सीला संरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्याला डॉमिनिकाहून भारतात न पाठवता अँटिग्वामध्ये परत पाठवावं, जिथे तो नागरिकत्वाच्या घटनात्मक संरक्षणाचा आधार घेऊ शकेल, यासाठी यूपीपी आग्रही आहे," असा दावा पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी केला.


4 ऑक्टोबर 2019 रोजी अँटिगा सरकारने चोक्सीचे नागरिकत्व रद्द केलं होतं. दरम्यान चोक्सीला डोमिनिकाहून भारतात परत पाठवणे हा निर्णय त्याच्या हक्काचं उल्लंघन करणारा ठरेल, ही शक्यताही पंतप्रधान ब्राऊन यांनी फेटाळून लावली.


'त्या' महिलेचा शोध सुरु!
अँटिग्वा आणि भारतीय एजन्सीने मेहुल चोक्सीचं अपहरण केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. मेहुल चोक्सीसोबत असलेली महिला त्याची गर्लफ्रेण्ड नसून अपहरण करणाऱ्या टोळीची सदस्य असल्याची माहिती त्याच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. या महिलेचं नाव बाबारा जाराबिका असल्याची माहिती ॲंटिग्वा मीडियाच्या माध्यमातून समोर आली.


पण मेहुल चोक्सीच्या जवळच्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "ही महिला अँटिग्वामध्ये राहत होती. सकाळ आणि संध्याकाळी वॉक करताना तिची आणि चोक्सीची मैत्री झाली. त्यानंतर तिने चोक्सीला भेटण्यास सुरुवात केली, त्याच्यासोबत मैत्री केली आणि 23 मे रोजी तिने चोक्सीला भेटण्यासाठी आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावलं. ज्यावेळी मेहुल चोक्सी तिथे पोहोचला तेव्हा एका टोळीने त्याचं अपहरण केलं आणि डॉमिनिका इथे नेलं. 


अँटिग्वा आणि भारतीय एजन्सीने मेहुल चोक्सीचं अपहरण केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, अँटिग्वामध्ये चोक्सीच्या वकिलांनी म्हटलं आहे की, चोक्सी 23 मे रोजी त्याची मैत्रीण बाबाराला भेटायला आला होता, पण जॉली हार्बर परिसरातील अँटिग्वा पोलीस आणि भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचे 'अपहरण' केलं.


"चोक्सी आपली कथित मैत्रीण बाबारा जाराबिकासोबत यॉटवर डिनर आणि फिरण्यासाठी शेजारील बेट डॉमिनिका इथे गेला होता आणि तिथे त्याला पकडण्यात आलं. परंतु मेहुलला पकडल्यानंतर त्याची मैत्रीण बाबारा जाराबिका बेपत्ता आहे, अशी माहिती अँटिग्वा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी दिली.


मेहुल चोक्सी आणि बाबारा मागील एक वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्याच कळतं. बाबाराचा शोध ही घेतला जात आहे. कारण त्या रात्री चोक्सीसोबत काय झालं, हे बाबाराच सांगू शकते. चोक्सीचं अपहरण करण्यात आलं का चोक्सी ॲंटिग्वामधून पळून गेला होता, हे तिच्या माहितीनंतरच स्पष्ट होईल.