लखनऊः बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19 वर्षीय बॅडमिंटनपटू भारतीय तरुणीचाही मृत्यू झाला आहे. तारूशी जैन असं मृत्यूमुखी पडलेल्या तरूणीचं नाव आहे. तिच्यावर गुडगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती तारुशीचे काका राजीव जैन यांनी दिली.

 

तारुशीवर तिचं जन्मगाव फिरोझाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडिल संजीव जैन यांनी भारत सरकारला विनंती केली होती. मात्र काही कारणास्तव तिच्यावर गुडगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

तारुशीचा मृतदेह आज दुपारी ढाक्यातून नवी दिल्लीला आणला जाणार आहे. नवी दिल्ली येथून मृतदेह गुडगावला नेला जाईल. हा मृतदेह दिल्लीत आणल्यानंतर तारुशीच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येईल.

 

चांगली बॅडमिंटनपटू

तारुशी एक चांगली बॅडमिंटनपटू असून तिने बांगलादेशमध्ये अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे तारुशी आराम करत होती, असं तारुशीची बहिण सलोनी जैन हिने सांगितलं.

 

चांगली बॅडमिंटनपटू असण्यासोबतच तारुशीला समाजसेवेची देखील आवड होती. ढाक्यात एक जुलै रोजी तारुशीने गरीबांच्या मुलांना शालेय साहित्य देखील वाटप केलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी ही दुर्घटना घडली, असं सलोनीने सांगितलं.