Happy Global Parents Day 2023 : आज जागतिक पालक दिन (Happy Global Parents Day 2023). जगात आपली ओळख आपल्या पालकांद्वारे केली जाते. आपले पालकच आपल्याला घडवतात आणि त्यांच्या नावानेच आपल्याला ओळख मिळते. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पालकांच्या संस्कारांमुळे आणि त्यांनी दिलेल्या संगोपनामुळेच आहोत. पालक आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यातील आनंदाशी तडजोड करतात. पालकांचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे 'जागतिक पालक दिन'. जागतिक पालक दिन हा दरवर्षी 1 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.


जागतिक पालक दिनाची सुरुवात कशी झाली


जागतिक पालक दिनाची सुरुवात सर्वात आधी 1994 मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये झाली. पालकांचा सन्मान व्हावा म्हणून या दिनाची सुरुवात करण्यात आली. हा दिवस साजरा करण्याच्या कल्पनेला युनिफिकेशन चर्च आणि सेंटर ट्रेंट लॉट यांनी पाठिंबा दिला आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 2012 मध्येच हा दिवस पालकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यासाठी सर्वसाधारण सभेने निवडला होता.
 
जागतिक पालक दिन हा दिवस मुलांच्या जीवनात पालकांचे महत्त्व नेमकं काय हे पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. पालकांची आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भूमिका साजरी करण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही ठिकाणी भाषणं, सभा, मैफिली आणि प्रदर्शनांचा समावेश करण्यात येतो. जगभरातील पालकांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यावेळी आई-वडील आणि मुलांच्या नात्यात एक वेगळीच आपुलकी पाहायला मिळते.


जागतिक पालक दिनाचे महत्त्व


आई-वडील आपल्या आयुष्यासाठी जे काही करतात, त्यामागे कोणताही स्वार्थ लपलेला नसतो. आपल्या मुलाच्या सुखासाठी ते काहीही करायला तयार असतात. आपल्या यशामागे सर्वात मोठा हात पालकांचा असतो. मात्र, याबाबत, त्यांनी दिलेल्या अमूल्य प्रेमाबाबत आपण त्यांचे कधीही आभार मानत नाही. जागतिक पालक दिन हा पालकांचे आभार मानण्याचा दिवस आहे. तसेच, आपले वृद्ध आई-वडील हे आपले ओझे नसून ते आपली जबाबदारी आहेत याची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. ही जबाबदारी आपण कर्तव्य समजून पार पाडली पाहिजे. या निमित्ताने अनेक देशांत आई-वडिलांना शुभेच्छा, भेटवस्तू दिल्या जातात. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी