China Nuclear Weapon : लष्करी क्षमतेसोबतच चीन (China) आपल्या अण्वस्त्रांची (Nuclear Weapon) संख्याही झपाट्याने वाढवत आहे. ही क्षमता इतकी असेल की, इतर कोणताही देश चीन सोबत युद्ध करण्यासाठी शंभर वेळा विचार करेल. दरम्यान, पेंटागॉनच्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे की, चीन अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या क्षमतेत दुपटीने वाढ करतोय. 2035 पर्यंत चीनमध्ये सुमारे 1,500 अण्वस्त्रे असण्याची शक्यता आहे. सध्या चीनकडे सुमारे 400 अण्वस्त्रे आहेत.


पेंटागॉनच्या अहवालात मोठा खुलासा


पेंटागॉनच्या एका अहवालात चीनबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्यामध्ये चीन वेगाने अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात पुढील 12 वर्षांत चीनकडे 1500 हून अधिक अण्वस्त्रे असतील, असे सांगण्यात आले आहे. पेंटागॉन हे अमेरिकेचे संरक्षण विभाग आहे, ज्या अंतर्गत देशाच्या सुरक्षेशिवाय जगातील सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवते. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, चीन अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची क्षमता दुपटीने वाढ करतोय. 


अमेरिकेसाठी आव्हान
पेंटागॉनने आपल्या अहवालात चीन सतत अमेरिकेसाठी आव्हान बनत असल्याचे नमूद केले आहे. या अहवालात चीनला जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच चीनकडून अण्वस्त्रांचा साठा वाढवण्यात येत आहे. अमेरिकेच्या संसदेत सादर केलेल्या वार्षिक अहवालात पेंटागॉन समितीने सांगितले की, बीजिंगचे येत्या काही वर्षाच अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकार्‍याच्या वतीने असे सांगण्यात आले की, चीन सतत म्हणतोय की, आपल्याकडे अण्वस्त्रे आहेत. ते केवळ स्वतःच्या संरक्षणासाठी, पण तसे नाही. जगात दहशत निर्माण करण्यासाठी तो शस्त्रांचा साठा सातत्याने वाढवत आहे. ज्यामध्ये समुद्र, आकाश आणि जमिनीवरून मारा करणाऱ्या धोकादायक अण्वस्त्रांचा समावेश आहे.


भारताने सतर्क राहण्याची गरज का आहे?


भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध 1962 पासून अत्यंत कटू आहेत. त्यामुळे आशिया खंडात जगातील दोन महासत्तांमध्ये थेट युद्ध होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. युद्धसदृश परिस्थिती नसली तरी अनेक मुद्द्यांवर भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर आहे. अलीकडेच गलवानच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. चीनमुळेच भारताला लडाखमध्ये आपली लष्करी स्थिती मजबूत करावी लागली आहे.



अवघ्या दोन वर्षांतच चीनकडे अण्वस्त्रांचा साठा दुप्पट
पेंटागॉनच्या या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे की, 2020 पर्यंत चीनकडे जवळपास 200 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ज्याची संख्या दुप्पट होण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागू शकतात, परंतु केवळ दोन वर्षांत चीनने अण्वस्त्रांचा साठा दुप्पट केला. ज्यामुळे आता अमेरिकन सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. चीनचा विकास या गतीने होत राहिला तर 2035 पर्यंत चीनकडे 1500 हून अधिक अण्वस्त्रे असतील. ज्यामुळे कोणत्याही देशाला धोका उद्भवू शकतो.