Girls Arrested For Not Wearing 'Hijab': संपूर्ण इराणमध्ये हिजाबवरून वातावरण तापलं आहे. इराणी मुलींनी हिजाबविरुद्ध आवाज उठवला असून त्यांनी तो फेकून देण्यास सुरुवात केली. याविरोधात पोलिसांनी अनेक मुलींना अटक केली आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार, दक्षिणेकडील शिराज शहरात स्केटबोर्डिंग इव्हेंटमध्ये हिजाब न घातल्याने इराणी पोलिसांनी अनेक मुली आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना ताब्यात घेतले आहे.


क्रीडा स्पर्धेनंतर मुलींनी हिजाब काढला


या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर येथील धार्मिक कट्टरवाद्यांना संताप अनावर झाला आहे. वृत्तसंस्था IRNA च्या वृत्तानुसार, अनेक मुलींनी धार्मिक मान्यता आणि कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून क्रीडा स्पर्धा संपल्यावर त्यांचे हिजाब काढले. या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांनाही अटक केली आहे. शोजईचे पोलिस प्रमुख फराज यांनी सांगितले की, अनेक मुलींनी धार्मिक विचार आणि कायदेशीर नियमांचे पालन न करता क्रीडा स्पर्धेच्या शेवटी त्यांचे हिजाब काढले.


व्हिडीओंच्या आधारे मुली आणि आयोजकांना इस्लामिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या मुलींनी देशाच्या इस्लामिक कायद्याचे उल्लंघन केले असून त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. याचदरम्यान शिराज शहराच्या गव्हर्नरने म्हटले आहे की, या कार्यक्रमामागील उद्देश देशाच्या धार्मिक आणि राष्ट्रीय नियमांना मोडणे हा होता, त्यामुळे आता हिजाबच्या पावित्र्यासाठी शुक्रवारच्या नमाजनंतर 15 जुलै रोजी कार्यक्रम आयोजित केला जाईल.






हिजाब घालणे अनिवार्य 


इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली होती, त्यानंतर महिलांना हिजाब घालणे बंधनकारक करण्यात आले. तसेच येथे कायदा आहे की, महिलांनी केस लपवताना डोके आणि मान झाकणारा असा हिजाब घालावा. मात्र आता इराणमध्ये हिबाज विरोधात उठणारे आवाज इस्लामिक कट्टरतावादी राजवटीला आव्हान देऊ लागले आहेत. त्यामुळे हा आवाज दाबण्यासाठी सरकार कठोर पावले उचलताना दिसत आहे.