इस्लामाबाद (पाकिस्तान) : लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाजवा यांची पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. राहील शरीफ यांची जागा बाजवा घेतील.


पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कमर बाजवा यांना फोर-स्टार जनरलच्या रँकवरुन पदोन्नती देत चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती केली.

पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी कमर बाजवा आणि जुबैर हयात यांना जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपदी नियुक्तीच्या निर्णयाला पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दुजोरा दिला.

जनरल राहील शरीफ मंगळवारी औपचारिकरित्या सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर कमर बाजवा पाकिस्तानी लष्कराचं प्रमुखपद सांभाळण्यास सुरुवात करतील.

राहील शरीफ यांनी जानेवारीतच स्पष्ट केले होते की, ते पदाचं कार्यकाळ वाढवण्याची मागणी करणार नाही. त्यावेळी बोलताना राहील म्हणाले होते, "मी ठरलेल्या तारखेला सेवनिवृत्त होईन." मात्र, पाकिस्तानला तुमच्या नेतृत्त्वाची गरज आहे, असे सांगून पीएमएल-एन सरकार राहील यांच्या पदाचा कार्यकाळ वाढवेल, अशी चर्चा होती. मात्र, राहील यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेत कोणतेही बदल झाले नाहीत.

जगात सहाव्या क्रमांकाची पाकिस्तानची सैनिक संख्या आहे. पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.