नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूनं थैमान घातलं असून या संसर्गानं अतिशय भयावह वळण घेतलेलं असतानाच, फ्रान्स या मित्रराष्ट्रानं मात्र देशातील परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त करत देशाच्या नेतृत्त्वाला दिलासा दिला आहे. India-EU virtual summit मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅकरोन यांनी जवळपास 26 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धीर वाढवणारं वक्तव्य केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताला लसीकरणाच्या मुद्द्यावरून कोणाच्याही शिकवणुकीची गरज नाही, असं ते स्पष्ट म्हणाले.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात देशातील नेतृत्त्व आणि सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनीच भारताविषयी नाराजीचा सूर आळवला. लसीकरण मोहिमेत येणाऱ्या अडचणींमुळंही अनेकांनीच तीव्र निराशा व्यक्त केली. पण, इतर कोणाकडूनही भारताला काहीही शिकवलं जाण्याची गरज नसल्याचं म्हणत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातून इतर राष्ट्रांना दिलेल्या लसींच्या मदतीची आठवण करुन दिली.
'लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत भारताला कोणीही काही शिकवणुकीचे धडे ऐकवण्याची गरज नाही. भारताकडून (लसींच्या रुपात) इतर राष्ट्रांना मानवतेच्या नात्यानं मदत करण्यात आली. सध्या हा देश कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे, हे आपण सर्वजण जाणतो', असं ते म्हणाले. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या परिषदेला जर्मनीच्या अँजेला मार्केल यांच्यासह इतरही दिग्गज प्रतिनिधींची उपस्थिती होती.
मोदी सरकारकडून कोरोना नव्हे, ट्विटरवरील टीकांना हटवण्यास प्राधान्य, लँसेटमधून ताशेरे
विकसित देशांकडून इतर राष्ट्रांच्या वाटेनं जाणाऱ्या लसींच्या पुरवठ्यात अडथळे आणले गेल्याचं म्हणजत या देशांनी इतर देशांना लस देण्यासाठी प्राधान्य देणं अपेक्षित होतं, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला.
भारताची 'मैत्री'पूर्ण मदत
पंतप्रधान नरेंद्र मोगी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं पुन्हा एकदा महत्त्वाच्या मार्गानं साऱ्या जगाचीच मदत केली. शेजारी आणि इतर विकसनशील राष्ट्रांना लसींचा पुरवठा करण्यासोबतच काही राष्ट्रांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफतही उपलब्ध करुन दिली. सारं जग कोरोनाच्या भयावह संकटाशी लढा देत असताना भारताकडून वॅक्सिन मैत्री या उपक्रमाअंतर्गत जवळपास 95 देशांना मदतीचा हात देण्यात आला.
आतापर्यंत लाखोंच्या संख्येनं कोरोना लसींचे डोस इराण, युगांडा, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, ब्राझील आणि यासारख्या देशांना पुरवण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला मात्र देशात कोरोना लसींची मागणी वाढल्यामुळे बाहेरील राष्ट्रांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला आहे.