Nobel Prize for Literature : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला आहे. अॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अॅनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांचा जन्म 1940 मध्ये झाला. फ्रान्समधील नॉर्मंडीमधील लहान शहरातील यवेटोटमध्ये त्यांचे बालपण केले. या लहान शहरात त्यांच्या आई-वडिलांचे एक किराण्याचे दुकान आणि कॅफे होते. ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अॅनी एर्नो यांनी 1974 मधील Les Armoires vides (Cleaned Out) या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांना La Place (A Man's Place) या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कार मिळाला.
मागील वर्षीचा नोबेल साहित्य पुरस्कार टांझानियामध्ये जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले लेखक अब्दुलराझक गुरनाह यांना देण्यात आला होता. त्यांच्या कादंबरीतून व्यक्ती आणि समाजांवर स्थलांतराच्या परिणामावर भाष्य करतात.
कोण आहेत अॅनी एर्नो?
अॅनी एर्नो या लहानपणापासून महत्त्वाकांक्षी राहिल्या आहेत. आपल्या लेखनात अॅनी यांनी सातत्याने विविध मार्गाने, पद्धतीने लिंग, भाषा आणि वर्गांवर आधारीत असमानतेवर लिखाण केले.
अॅनी एर्नो यांचे साहित्य हे एक प्रकारे राजकीय भाष्य करणारे असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या साहित्यातून असमानता भेदभावाविरोधात भाष्य करण्यात आले.
दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार स्थगित
1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात फक्त दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे पहिल्यांदा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला होता. तर, दुसऱ्यांदा 2018 मध्ये स्वीडिश अॅकेडमीच्या परीक्षक सदस्या कॅटरिना यांचे पती आणि फ्रेंच फोटोग्राफर जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे पुरस्कार स्थगित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरुप काय?
सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिशी क्रोनर ( जवळपास 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वीडिशी क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे.