मुंबई: परदेशात कोणत्या चॅलेंजचं फॅड येईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज देऊन, मित्रांना काहीही करायला लावल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी परदेशातून आलेलं आईस बकेट चॅलेंज सर्वांना परिचीत आहे.


मात्र आता सोशल मीडियावरील एका चॅलेंजने टोक गाठलं आहे. ते चॅलेंज आहे ‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ आपण त्याला सोप्या भाषेत कंडोम हुंगणे म्हणू. पण ‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ केवळ नाकाने हुंगण्यापर्यंत मर्यादित नाही, तर कंडोम नाकातून हुंगून, तोंडातून बाहेर काढणं, इतकं अघोरी आहे.

सोशल मीडियावर लाईक्स, शेअर, व्ह्यूव्ज मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, त्याचं उदाहरण म्हणजे ‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ आहे.

काय आहे स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’?

‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ स्वीकारणारा तरुण/तरुणी कंडोम घेऊन, तो एका नाकपुडीतून आत-आत ओढतो. तो इतका आत ओढला जातो की तो टाळ्यातून तोंडात येतो. मग तो तोंडातून बाहेर काढला जातो.

एका नाकपुडीत कंडोम घातल्यानंतर, दुसरी नाकपुडी बोटाने बंद करुन, कंडोम तोंडापर्यंत आणला जातो. या कृतीदरम्यानच श्वासोच्छवास सुरु असतो, असं हे जीवघेणं चॅलेंज आहे.

हे चॅलेंच पूर्ण केल्यानंतर त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला जातो.

यूट्यूबवर असंख्य व्हिडीओ

परदेशातील हे फॅड यूट्यूबवर चांगलंच गाजत आहे. ‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ पूर्ण करुन, त्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केले जात आहेत.

टीनेजर्सची संख्या अधिक

हे चॅलेंज पूर्ण करण्याचं वेडं धाडस करणारी अनेक मुलं टीनेजर्स अर्थात 13 ते 19 वयाची आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने, तरुणांमध्येही हे फॅड पसरलंआहे.

अनेक मुलं, तरुणांच्या यूट्यूब अकाऊंटवर असे असंख्य व्हिडीओ अपलोड झालेले दिसत आहेत.

जुनंच चॅलेंज, नव्याने चर्चेत

‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ सध्या चर्चेत असलं, तरी ते नव्याने आलेलं नाही. यापूर्वी 2013 मध्येही ‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’चा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. तर 2007 मध्येही असाच व्हिडीओ होता, जो यूट्यूबवरुन हटवण्यात आला होता.

धोकादायक

स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज हे अतिशय धोकादायक असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. नाकातून कंडोम ओढल्यामुळे श्वास तर गुदमरु शकतोच, शिवाय अॅलर्जी, संसर्ग किंवा आतील नाजूक त्वचेला धोका पोहोचू शकतो.

केवळ सोशल मीडिया फॅड

‘स्नोर्टिंग कंडोम चॅलेंज’ हे केवळ सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्याचं फॅड आहे. केवळ लाईक्स, शेअर, सबस्क्राईबर वाढवण्यासाठी हे जीवघेणं आणि अघोरी चॅलेंज केलं जात आहे.

VIDEO विचलित करु शकतात