इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सह-अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांना बनावट बँक खात्याच्या प्रकरणी अटक झाली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊन्टिबिलिटी ब्युरोने (NBA) इस्लामाबाद येथील त्यांच्या घरातून त्यांना अटक केली.


सोमवारी झालेल्या सुनावणीत इस्लामाबाद हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी जरदारी यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.





इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमीर फारुक आणि मोशीन अख्तर कयांनी यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर जरदारी यांचा जामीन फेटळण्याचा निर्णय घेतला. जरदारी यांच्या अटकेनंतर नॅशनल अकाऊन्टिबिलिटी ब्युरो टीमने (NBA) पाकिस्तानच्या संसदेत जाऊन नॅशनल अॅसेंब्लीचे स्पीकर असद कैसर यांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणात जरदारी यांची बहीण फरयाल तालपूर देखील आरोपी आहेत.


बनावट बँक खात्याप्रकरणी तपास करत असलेल्या नॅशनल अकाऊन्टिबिलिटी ब्युरोने (NBA) रविवारी आसिफ अली जरदारी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. संपत्ती बाळगणे आणि संपत्ती पाकिस्तानाबाहेर पाठवण्यासाठी बनावट बँक खात्यांचा वापर करण्याचं हे प्रकरण आहे. नॅशनल अकाऊन्टिबिलिटी ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार या बनावट बँक खात्यांच्या मार्फत 15 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.