लाहोर : पाकिस्तानमधील आगामी निवडणुकीपूर्वीच शरीफ कुटुंबाला कोर्टाने मोठा दणका दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ कन्या मरियम शरीफसोबत लंडनहून लाहोरला रवाना झाले आहेत.
पनामा गेट भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने शरीफ यांना दहा वर्ष, तर मरियम यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे लाहोरला पोहचताच दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.
तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या शरीफ यांना गेल्या वर्षीच कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 6 जुलैला दोघांना शिक्षा सुनावण्यात आली.
नवाझ शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसूम नवाझ आजारी आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी ईद उल फित्रनंतर बापलेक लंडनला गेले होते. त्यानंतर अबुधाबीमार्गे दोघंही लंडनहून लाहोरला परतत आहेत.
दोघांच्या अटकेनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लाहोरमध्ये 10 हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
मरियम नवाझ यांचे पुत्र जुनैद आणि हुसैन नवाझ यांचे पुत्र झिकेरिया यांना यूके पोलिसांनी अटक केली आहे. लंडनमध्ये अॅव्हनफील्ड अपार्टमेंटबाहेर आंदोलकांवर हल्ला केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.