बलुचिस्तान (पाकिस्तान) : बलुचिस्तान प्रांत आज मोठ्या स्फोटाने हादरून गेला. या स्फोटात तब्बल 70 निरपराध लोकांचे प्राण गेल्याची माहिती पाकिस्तानातील माध्यमांनी दिली, तर स्फोटात 120 लोक जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
बलुचिस्तानातील मस्तुंग जिल्ह्यामध्ये स्फोट घडवण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, हा स्फोट बलुचिस्तान अवामी पार्टी पक्षाचे उमेदवार सिराज यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या स्फोटानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
सिराज हे पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब असलम राईसनी यांचे लहान भाऊ होते. त्यामुळे त्यांच्या हत्येने पाकिस्तानात मोठी खळबळ माजली आहे.
हा स्फोट म्हणजे आत्मघातकी हल्ला असल्याचं बलुचिस्तानच्या प्रशासनानं म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात माजी मुख्यमंत्री अकरम खान दुर्रानी यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.