मुंबई : तुरुंगातून सुटलेल्या आणि ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या नॉर्वेतील काही तरुणांनी प्रायश्चित्त घेण्याचा नवा मार्ग शोधला आहे. योगाभ्यासाकडे झुकलेल्या या तरुणांच्या ग्रुपने मुंबईत तळ ठोकला आहे. महिलांसाठी मुंबईत स्वच्छतागृह बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ महिलांसाठी स्वच्छतागृहं बांधण्यात येत आहेत. सामान्य नागरिकांसाठी एप्रिलच्या मध्यापर्यंत ही टॉयलेट्स खुली करण्याचा त्यांचा मानस आहे. 'बॅक इन द रिंग' असं नॉर्वेतून भारतात आलेल्या तरुणांच्या ग्रुपचं नाव आहे. 'इंडियाटाईम्स.कॉम' या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

अॅलेक्झँडर मेदिनने पुढाकार घेत स्वच्छतागृह बांधण्याचा चंग बांधला. घराबाहेर असताना महिलांसाठी किमान स्वच्छता उपलब्ध व्हावी, हा मेदिन यांचा हेतू आहे. नॉर्वेची चॅरिटेबल ऑर्गनायझेशन 'बीआयटीआर' आणि जेएसडब्ल्यू यांनी संयुक्तपणे या प्रकल्पासाठी फंडिंग केलं आहे.

यापूर्वीच्या भारत दौऱ्यात या ग्रुपने कर्नाटक आणि गोव्यातही असेच प्रकल्प राबवले आहेत. इथली उष्णता, प्रदूषण, आवाज या सगळ्याचा आम्हाला त्रास झाला, पण आम्ही काम करत राहिलो, असं मेदिन सांगतो.

फेब्रुवारीपासून रोज सकाळी दहा वाजता आम्ही इथे हजर व्हायचो. सुरुवातीला आम्ही ग्रँट रोडमधल्या रेड लाईट एरिआत राहायचो. त्यानंतर क्रॉफर्ड मार्केट परिसरात आम्ही शिफ्ट झालो. एकाला न्यूमोनिया झाला, तर काही जणांना डिसेंट्रीची लागण झाली. मात्र आम्ही काम करत राहिलो, असं मेदिन सांगतो.

आमच्या मेहनतीचा चांगला परिणाम व्हावा, अशी आमची इच्छा आहे. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेले नॉर्वेतील काही जण जर त्यांना माहितही नसलेल्या लोकांसाठी श्रम आणि पैसे खर्च करत असतील भारतीयांनी काहीतरी बोध घ्यावा, असं मतही मेदिनने व्यक्त केलं.