रिओ दी जिनेरियो : ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल टेमेर यांनी भूताच्या भीतीनं शासकीय निवसास्थान असलेलं आपलं अलिशान घर सोडलं आहे. ब्राझिलच्या एका साप्ताहिक ग्लोबो न्यूजपेपरनं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं असून, मिशेल यांनी भूताच्या भीतीनं एल्वोरेडा पॅलेस सोडलं आहं.


टेमेर यांनीच याला दुजोरा दिला असल्याचंही या बातमीत म्हणलं आहे. तसेच सध्या टेमेर आपली पत्नी आणि सात वर्षांच्या मुलगा मिशेलजिन्होसोबत उप राष्ट्राध्यक्षच्या घरी राहायला गेल्याचंही त्यांनी सांगितलं.

टेमेर यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, त्या घरामध्ये मला विचित्र वाटत होतं. त्या घरामध्ये मी पहिल्या रात्रीपासून झोपू शकलो नाही. माझ्यासोबत माझी पत्नी मार्केला हिला देखील असंच अस्वस्थ वाटत होतं. केवळ आपल्या मुलाला ते घर प्रचंड आवडलं होतं. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करत होता. पण आम्हाला या घरात भूत असल्याचा याचा संशय येत होता.

वास्तविक, ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षच्या शासकीय निवासस्थान असलेल्या एल्वोरेडा पॅलेसमध्ये सर्व सुविधा आहेत. या घरात स्विमिंग पुलापासून फुटबॉल मैदान, रुग्णालय, मोठा अलिशान बगीचा आदी सुविधा आहेत. याचं डिझाइन ब्राझीलचे वास्तूविशारद ऑस्कर नायमेयर यांनी केलं आहे.

दरम्यान, टेमेर यांच्या सहकार्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने, टेमेर यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. तसेच 2014 मध्ये अवैध देणगी घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु आहे.