वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्तीला देहदंड होणार आहे. भारतीय आजी-नातीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी रघुनंदन यंदमुरीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


23 फेब्रुवारी 2018 रोजी रघुनंदनला फाशी देण्याचं स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलं आहे. 32 वर्षीय रघुनंदनने 61 वर्षीय भारतीय महिलेसह सान्वी या तिच्या 10 महिन्यांच्या नातीची अपहरण करुन हत्या केली होती. 2014 मध्ये अपहरण आणि हत्येप्रकरणी त्याला सर्वोच्च शिक्षा सुनावण्यात आली.

खंडणीसाठी रघुनंदनने सान्वी वीणाचं अपहरण केल्याचं सिद्ध झालं होतं. दोषी ठरल्यानंतर त्याला मृत्यूदंड सुनावण्यात आला. शिक्षेविरोधात त्याने कोर्टात धाव घेतली होती, मात्र एप्रिलमध्ये तो केस हरला होता.

पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी 2015 मध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे रघुनंदनच्या फाशीला स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेन्सिल्वेनियामध्ये गेल्या 20 वर्षात एकही मृत्यूदंड झालेला नाही. 1976 नंतर 1995 आणि 1999 साली तिघा जणांना डेथ पेनल्टी झाली होती.

आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेला यंदमुरी एच-1बी व्हिसावर अमेरिकेला आला होता. इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याने पदवी पटकावली होती.