सुदानमधील कारखान्यात भीषण स्फोट, 18 भारतीयांचा मृत्यू
एबीपी माझा वेबटीम | 04 Dec 2019 07:11 PM (IST)
सुदानची राजधानी खार्तूमजवळच्या परिसरातील एका कारखान्यामध्ये एलपीजी टँकरचा मोठा स्फोट होऊन त्यामध्ये 18 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करुन या भीषण स्फोटाची दुःखद माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्तूमजवळच्या परिसरातील एका कारखान्यामध्ये एलपीजी टँकरचा मोठा स्फोट होऊन त्यामध्ये 18 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करुन या भीषण स्फोटाची दुःखद माहिती दिली आहे. जयशंकर यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दूतावास आणि सरकारने मिळून 24 तास इमर्जन्सी हेल्पलाईन सुरु केली आहे. +249-921917471 हा हेल्पलाईन नंबर जयशंकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये नमूद केला आहे. मंगळवारी रात्री खार्तूममधील सिरॅमिक कारखान्यात हा स्फोट झाला होता. सुदानमधील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे की, मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत, त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत आहेत.