FIFA World Cup 2022 : कतारमध्ये ( Qatar ) सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाकडे ( FIFA World Cup 2022 ) जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रविवारी फिफा स्पर्धेत बेल्जियमला ( Belgium ) मोरोक्कोकडून ( Morocco ) पराभव पत्करावा लागला. मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 ने दारुण पराभव केला. याचे पडसाद बेल्जियमच्या राजधानीमध्ये पाहायला मिळाले. बेल्जियमच्या राजधानी ब्रसेल्समध्ये ( Brussels ) अनेक ठिकाणी हिंसाचार उसळल्याचं ( Belgium Riots ) पाहायला मिळालं. आंदोलकांनी गाड्या पेटवल्या.


मोरोक्कोकडून पराभवानंतर बेल्जियममध्ये हिंसाचार उसळला


रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या हवाल्या एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, फिफा फुटबॉल विश्वचषक सामन्यात ( FIFA 2022 ) मोरोक्कोने बेल्जियमवर ( Belgium Vs Morocco ) विजय मिळवल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये चाहत्यांनी निषेध करत कार आणि काही स्कूटर पेटवल्या. बेल्जियममध्ये दंगल झाली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.






फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या


बेल्जियमचा मोरोक्कोकडून पराभव झाल्यानंतर रविवारी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. फुटबॉल चाहत्यांनी गाड्या पेटवल्या. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक पोलिसांनी दंगल नियंत्रण पोलिसांशी झटापट करणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलं आहे. ब्रुसेल्समध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे. यावरून दंगलीमागचं स्पष्ट कारण आणि सूत्रधार कोण आहे याचा शोध घेता येईल.


मेट्रो आणि ट्राम सेवा बंद


ब्रुसेल्सचे महापौर फिलिप क्लोस यांनी लोकांना ब्रुसेल्स शहराच्या मध्यभागापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे, कारण या भागात दंगल उसळली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून ब्रुसेल्समधील मेट्रो आणि ट्राम सेवा तात्पुरती बंद केली आहे. हिंसाचार होण्याचा धोका पाहता रस्त्यावर पोलिसांची बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.