वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज संपणार आहे. आता काही तासांतच नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हिंसक हल्ल्याची निंदा केली. याचसोबत त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी शुभेच्छाही दिल्या.
अमेरिकेच्या संसंदेत झालेल्या हल्ल्यामुळे सर्वजण भयभीत : डोनाल्ड ट्रम्प
19 मिनिटांच्या आधीच रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेच्या संसदेवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वजण भयभीत झाले होते. आम्ही अमेरिकन म्हणून सांभाळून ठेवलेल्या त्या प्रत्येक गोष्टीवर राजकीय हिंसाचार हा एक हल्ला आहे. हे कधीही सहन केले जाऊ शकत नाही." यादरम्यान त्यांनी अमेरिकेच्या जनतेला राजकीय वर्गापेक्षा वर येण्याचे आवाहन केले.
ट्र्म्प यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या भाषणात जीवघेण्या कोरोना व्हायरसचाही उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले की, "चीनसोबत आम्ही नव्या रणनीतीसंदर्भात करार केला आहे. आपले व्यापार संबंध वेगाने बदलत होते आणि अमेरिकेत अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती. परंतु, कोरोना व्हायरसने आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्यास भाग पाडलं."
आपण जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण केली : डोनाल्ड ट्रम्प
आपला कार्यकाळातील आठवणी ताज्या करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आपण सर्वांनी अमेरिकेला महना बनवण्यासाठी एक मिशन सुरु केलं. आपण जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण केली." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला दशकातील असा पहिला राष्ट्रपती होण्यावर गर्व आहे, ज्याने कोणतीच नवी लढाई सुरु केली नाही."
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या दिवसांत बायडन प्रशासन यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, "आता आम्ही नव्या प्रशासनाचं स्वागत करतो आणि अमेरिकेला सुरक्षित आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही नव्या प्रशासनाला आमच्या शुभेच्छा देतो."
फेअरवेलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्नी मेलनिया ट्रम्प आणि कुटुंबियांच्या समर्थनासाठी आभार मानले. त्याचसोबत त्यांनी उपराष्ट्रपती माइक पेंस यांचेही आभार मानले.