Author Salman Rushdie Attack : भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक, कादंबरीकार सलमान रश्दी  (Salman Rushdie) यांच्या तब्येतीची माहिती समोर आली आहे. त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि एक हात निकामी झाला आहे. लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांच्यावर एका आरोपीने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते. 


अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे एका साहित्यिक कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये ही घटना घडली होती. न्यूयॉर्कमधील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले, त्यात ते जखमी झाले. व्याख्यान देण्यापूर्वी सलमान रश्दी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या प्रकृतीची ताजी माहिती समोर आली आहे. एजंट अँड्र्यू वायली याने दिलेल्या माहितीनुसार, सलमान रश्दी यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि त्यांच्या एका हाताने काम करणं बंद केले आहे. 


एका डोळ्याची दृष्टी गेली, एक हात निकामी


सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांचा एजंट अँड्र्यू वायली याने एका स्पॅनिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रश्दी यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, सलमान रश्दी यांच्यावर झालेला हल्ला गंभीर होता. त्यांच्या घशात तीन खोल जखमा होत्या, ज्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आणि एका हात निकामी झाला आहे.


काय म्हणाले रश्दी यांचे एजंट?


सलमान रश्दी यांचा एजंट अँड्र्यू वायली याने एल पेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमान रश्दी यांच्या जखमा खोल आहेत. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. घशात तीन गंभीर जखमा होत्या. हातातील नसा कापल्या गेल्याने एक हात निकामी झाला आहे. त्यांच्या छातीवर आणि धडावर 15 जखमा होत्या.


सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला



  • सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आहेत.

  • ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला होता.

  • सलमान रश्दी यांच्याविरोधात इराणमधूनही फतवा काढण्यात आला आहे.

  • त्याच्यावर हल्ला करणारा 24 वर्षीय आरोपी हादी मतार (Hadi Matar) न्यूजर्सी येथील कारागृहात बंद आहे. 

  • सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात पाठवण्यात आले.