वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या घातपाताचा डाव उधळून टाकण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. बराक ओबामा यांच्या कार्यालयात आणि हिलरी क्लिंटन यांच्या निवासस्थानी स्फोटकांची पाकीटं आढळून आली होती.


धक्कादायक म्हणजे ही स्फोटकांची पाकीटं हिलरी यांच्या घरी पार्सलनं पाठवण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांना याबाबतची माहिती बुधवारी मिळाली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणांना क्लिंटन यांच्या निवासस्थानी तर ओबामा यांच्या कार्यालयाभोवती सुरक्षा वाढवून स्फोटकं नष्ट केली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर व्हाईट हाऊसकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली.





पार्सलनं आलेली ही पाकीटं ओबामा किंवा हिलरी क्लिंटन यांनी स्वीकारली नव्हती. तसेच ही पाकीटं थेट त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकली नसती, त्यामुळे त्यांना यातून काहीही धोका नसल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं आहे.


अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआय याप्रकरणी तपास करत आहे. दरम्यान सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयातही स्फोटकं पाठवण्यात आली होती, अशी माहिती आहे. संशयास्पद पाकीटं सापडल्यानंतर वृत्तवाहिनीच्या न्यूयॉर्क ब्युरो कार्यालय खाली करण्यात आलं होतं.