बीजिंग : मकाऊ आणि हाँगकाँग या शहरांना जोडणाऱ्या जगातील सर्वात लांब सागरी पूलाचं उद्घाटन झालं. 55 किलोमीटर लांबीचा हा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुलाचं उद्घाटन केलं.


पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा जगातील सर्वात लांब सागरी पूल आहे. पुलाचं बांधकाम डिसेंबर 2009 मध्ये सुरु झालं होतं. 20 बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे एक लाख 47 हजार कोटी रुपये खर्च करुन हा पूल उभारण्यात आला.

हाँगकाँग आणि मकाऊ या दोन शहरांमध्ये मिळून 6 कोटी 80 लाख नागरिक राहतात. या पुलामुळे दोन शहरांमधील अंतर तीन तासांवरुन अवघ्या 30 मिनिटांवर आलं आहे.

या सागरी पुलामध्ये पाण्याखालून जाणाऱ्या बोगद्यांचाही समावेश आहे. वाढतं बजेट, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कामगारांचे मृत्यू यामुळे पुलाचं बांधकाम होण्यास नऊ वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं.