Elon Musk on Taj Mahal  : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाची  (Taj Mahal) सुंदरता कुणालाही मोहित करते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी देखील ताजमहालाचं कौतुक केलं आहे.  ट्विटरवर एका यूझरनं आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या (Red Fort) भिंतीवरील नकाशाचा फोटो शेअर केला आहे. यावर रिप्लाय करताना एलॉन मस्कनं म्हटलं आहे की, हे अद्भुत आहे. मी 2007 साली इथं गेलो होतो, मी ताजमहाल देखील पाहिला आहे. जे खरोखर जगातील मोठं आश्चर्य आहे.  






एलॉन मस्क यांच्या ट्वीटवर पेटीएम (Paytm)चे फाऊंडर आणि सीईओ विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी देखील रिप्लाय केला आहे. त्यांचा हा रिप्लाय व्यावसायिक बाजूनं आल्याचं दिसतंय. त्यांनी म्हटलं आहे की,  'टेस्लाकडून भारतासाठी एफएसडी (फुल सेल्फ ड्रायव्हिंग कार) बनवणं एक मोठं आव्हान आहे. आम्ही सर्वात अनियंत्रित रोड यूझर्स म्हणून ओळखले जातो. असो, आपण ताजमध्ये पहिली टेस्ला देण्यासाठी कधी येणार आहात?' असं शर्मा यांनी म्हटलं आहे.  






एलॉन मस्क यांनी मागील वर्षी म्हटलं होतं की, टेस्ला भारतात मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावू शकतं. त्यांनी म्हटलं होतं की, टेस्ला भारतात आपली वाहनं उतरवू इच्छिते मात्र इथं अन्य मोठ्या देशाच्या तुलनेत आयात शुल्क जास्त आहे.  टेस्लानं भारतात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. मागील महिन्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं की, जर टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात तयार करायला तयार असेल तर काही अडचण नाही मात्र कंपनीनं चीनवरुन कार आणू नये.  


एलॉन मस्क यांच्या आईनंही केला रिप्लाय 

एलॉन मस्क यांनी आपल्या आग्रा यात्रेविषयी रिप्लाय केल्यानंतर त्यांच्या आई माये मस्क (Maye Musk) यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे की,  1954 मध्ये तुझे आजी आजोबा दक्षिण अफ्रिकेवरुन ऑस्ट्रेलियाला जात होते त्यावेळी ताजमहाल पाहायला गेले होते. सिंगल इंजिन असलेल्या प्रोपेलर विमानात रेडिओ आणि जीपीएस विना ही यात्रा करणारे ते पहिले व्यक्ती होते. त्यांचं आदर्श वाक्य होतं, 'लिव्ह डेंजरसली...केअरफुली।'






एडिटचं बटण कुठं आहे? मस्क यांच्या आईचा सवाल
एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क (Maye Musk) यांनी ट्वीट करताना ताजमहालला भेट दिल्या वेळचा एक फोटो शेअर केला मात्र वर्ष लिहिताना चुकीचं लिहिलं. फोटो ट्वीट करताना त्यांनी 2007 साली ताजमहाल पाहायला गेले होते असं लिहिलेलं मात्र त्यानंतर त्यांनी म्हटलं की, 2007 नाही तर 2012 साली ताजमहाल पाहायला गेले होते असं म्हटलं आहे. हे सांगताना त्यांनी एडिटचं बटण कुठं आहे? असा सवाल देखील केला आहे.